पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी वाहिली श्रध्दांजली, शासनाच्या वतीने सर्वोतोपरी मदतीची पालकमंत्र्यांची ग्वाही
जळगाव,दि.१९ नोव्हेंबर (जिमाका) – अमर रहे…, अमर रहे… वीर जवान विनोद पाटील अमर रहे…’च्या घोषात आज सकाळी रोटवद, ता.धरणगाव येथे वीर जवान विनोद शिंदे – पाटील यांना हजारो नागरिकांनी साश्रूपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप दिला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जवान विनोद पाटील यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करत श्रध्दांजली वाहिली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांचा अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करण्यात आला.
भारतीय सैन्य दलात अहमदाबाद येथे कर्तव्य बजावत असताना जवान विनोद जवरीलाल शिंदे- पाटील (वय ३९) यांचा शनिवारी, १८ नोव्हेंबर रोजी आकस्मिक मृत्यू झाला. दरम्यान, शहीद जवानाची वार्ता रोटवदला धडकताच संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली होती. त्यांचे पार्थिव आज सकाळी रोटवद, ता. धरणगाव येथे आणण्यात आले. त्यानंतर सजविलेल्या वाहनातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यानिमित्त ग्रामस्थांनी अंगणात रांगोळ्या रेखाटल्या होत्या. शालेय विद्यार्थी हातात तिरंगा घेवून ‘अमर रहे…, अमर रहे….. वीर जवान विनोद पाटील अमर रहे’ सह भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा देत होते.

वीर जवान विनोद पाटील यांचे पार्थिव अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आल्यानंतर राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, एरंडोल प्रांताधिकारी मनिष गायकवाड, तहसीलदार महेंद्र सुर्यवंशी, गटविकास अधिकारी सुशांत पाटील, सहायक पोलिस निरीक्षक जिबाऊ पाटील, रोटवद सरपंच सुदर्शन पाटील, पोलीस पाटील नरेंद्र शिंदे यांचेसह मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. पोलीस दलाच्या तुकडीने हवेत गोळीबाराच्या तीन फैरी झाडत मानवंदना दिली. सैन्य दल व माजी सैनिकांनीही वीर जवानास अभिवादन केले. वीर जवान पाटील यांचा मुलगा आदित्य यांनी मुखाग्नी दिला.
पालकमंत्री गुलाबराव पाटील श्रद्धांजली वाहतांना म्हणाले की, आपल्या तालुक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विनोद पाटील यांच्या कुटुंबीयांस महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही ही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.
यावेळी वीर जवान पाटील यांचे कुटुंबीय, सैन्य दलाचे अधिकारी, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, नातेवाईक, आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.