कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत असल्याने अल्पभूधारक असलेल्या शेतकऱ्याने कर्जाच्या विवंचनेत संपविली जीवन यात्रा.

Spread the love

भडगाव :- तालुक्यातील कजगाव येथील अल्पभूधारक कर्जबाजारी शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे उघड झाले. शिवाजी महाजन (४५) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. कजगाव बस स्थानकालगतच्या सावता माळी चौकात शिवाजी महाजन हे कुटुंबियांसह वास्तव्याला होते. त्यांच्याकडे दोन एकर शेती असून, त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून होता. राहत्या घरातच शिवाजी यांनी गळफास घेतल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी त्यांना भडगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. अत्यल्प पावसाने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतातील उत्पादन ७० टक्क्यांपेक्षा अधिक घटल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. येणारे उत्पन्न पाहून शेतीवर घेतलेले अनेक प्रकारचे कर्ज फेडण्याची कुठलीच शक्यता दिसत नसल्याने हतबल झालेल्या महाजन यांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. महाजन यांच्यामागे आई, पत्नी, दोन मुली, मुलगा, दोन भाऊ असा परिवार आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार