मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : विशाखापट्टणम येथे झालेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाने दिलेले २०९ धावांचे लक्ष्य गाठले. गुरुवारी (२३ नोव्हेंबर) झालेल्या या विजयासह भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारताने आपल्या टी-२० इतिहासातील सर्वात मोठे लक्ष्य गाठले आहे. त्यांनी चार वर्षे जुना विक्रम मोडला. टीम इंडियाने हैदराबादमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध २८ धावा करत सामना जिंकला होता.
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२ मध्ये दुसऱ्यांदा २०० हून अधिक धावांचे लक्ष्य गाठले आहे. गेल्या वेळी टीम इंडियाने राजकोटमध्ये असे केले होते. २०१३ मध्ये भारताने २०२ धावा करत विजय मिळवला होता. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने १९० किंवा त्याहून अधिक धावा केल्याचा हा सहावा प्रसंग होता. दुर्दैवाने प्रत्येक वेळी त्या संघाला पराभवाला सामोरे जावे लागले.
भारताचा नवा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने २० षटकात तीन विकेट गमावत २०८ धावा केल्या. टीम इंडियाने १९.५ षटकांत ८ विकेट गमावत २०९ धावा करत सामना जिंकला. भारताने पाचव्यांदा टी-२० मध्ये २०० हून अधिक धावांचे लक्ष्य गाठले आहे. या बाबतीत त्याने दक्षिण आफ्रिकेला मागे टाकले. आफ्रिकन संघाने चार वेळा अशी कामगिरी केली आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहेत. दोघांनी प्रत्येकी तीन वेळा टी-२० मध्ये २०० हून अधिक धावांचे लक्ष्य गाठले आहे.
२०९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाचे दोन्ही सलामीवीर १५ चेंडूतच तंबूमध्ये परतले. ऋतुराज गायकवाड पहिल्याच षटकात खाते न उघडता धावबाद झाला. त्याला एका चेंडूचाही सामना करता आला नाही. तिसर्याच षटकात यशस्वी जैस्वाल तंबूमध्ये परतला. यशस्वीने आठ चेंडूत २१ धावा केल्या. दोन गडी बाद झाल्यानंतर इशान किशन आणि सूर्यकुमार यांनी डावाची धुरा सांभाळली. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी ११२ धावांची भागीदारी केली. सूर्यकुमारने ४२ चेंडूत ८० धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ९ चौकार आणि ४ षटकार मारले. इशान किशनने ३९ चेंडूत ५८ धावा केल्या. त्याने २ चौकार आणि ५ षटकार मारले. रिंकू सिंगने १४ चेंडूत ४ चौकारांच्या मदतीने नाबाद २२ धावा करत संघाला विजयाकडे नेले. तिलक वर्माने १२ आणि अक्षर पटेलने २ धावा केल्या. रवी बिश्नोई आणि अर्शदीप सिंग यांना खातेही उघडता आले नाही. मुकेश कुमार शून्यावर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून तन्वीर संघाने दोन बळी घेतले. जेसन बेहरेनडॉर्फ, मॅथ्यू शॉर्ट आणि सीन अॅबॉट यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
टीम इंडियाने १९.५ षटकांत ८ विकेट गमावत २०९ धावा करत सामना जिंकला. सामन्यातील शेवटचे षटक अतिशय रोमांचक होते. यामध्ये टीम इंडियाच्या तीन विकेट पडल्या आणि रिंकू सिंगच्या षटकारावर भारताला सहा धावा मिळाल्या नाहीत. २० व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर रिंकूने चौकार लगावला, दुसर्या चेंडूवर एकेरी धाव घेतली. तिसर्या चेंडूवर अक्षर पटेल बाद झाला. चौथ्या चेंडूवर रवी बिश्नोई धावबाद झाला. पाचव्या चेंडूवर अर्शदीप सिंग धावबाद झाला. सहाव्या चेंडूवर रिंकू सिंग चेंडूला सामोरा गेला. जर तो बाद झाला असता किंवा एकही धाव काढू शकला नसता तर सामना सुपर ओव्हरमध्ये गेला असता. पण तसे झाले नाही. सीन अॅबॉटच्या चेंडूवर रिंकूने षटकार ठोकला. दुर्दैवाने तो रिंकूच्या खात्यात जमा झाला नाही, कारण अॅबॉटचा पाय क्रीजच्या बाहेर होता आणि पंचांनी त्याला नो-बॉल म्हटले होते. अशा परिस्थितीत भारताच्या खात्यात षटकारा ऐवजी एकच धाव जमा झाली आणि टीम इंडियाने एक चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाकडून जोश इंग्लिशने शानदार शतक झळकावले. त्याने ५० चेंडूत ११० धावा केल्या. या काळात त्याने ११ चौकार आणि ८ षटकार मारले. इंग्लिशने २२० च्या धावगतीने धावा केल्या. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील त्याचे हे पहिलेच शतक होते. केवळ ४७ चेंडूंत त्याने शतक झळकावले होते. भारताविरुद्ध सर्वात वेगात शतक झळकवणारा तो दुसरा फलंदाज ठरला. दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरने सर्वात वेगवान शतक झळकावले आहे. मिलरने गुवाहाटी येथे २०२२ मध्ये केवळ ४६ चेंडूंत शतक झळकावले होते. वेस्ट इंडिजच्या इविन लुईसने २०१६ मध्ये ४८ चेंडूंत शतक झळकावले होते. दक्षिण आफ्रिकेच्या रिले रुसो यानेही २०२२ मध्ये इंदौर येथे ४८ चेंडूंत शतक झळकावले होते. ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने २०१९ मध्ये बंगळुरू येथे ५० चेंडूंत शतक झळकावले होते. जोश इंग्लिशने स्टीव्ह स्मिथसोबत दुसऱ्या विकेटसाठी १३० धावांची भागीदारीही केली. स्मिथने ५२ धावांची खेळी खेळली. टीम डेव्हिडने नाबाद १९ धावा केल्या. मॅथ्यू शॉर्ट १३ धावा करून बाद झाला. मार्कस स्टॉइनिसने नाबाद ७ धावा केल्या. भारताकडून प्रसिध कृष्णा आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
सूर्यकुमार यंदाच्या वर्षातला टी-२० क्रिकेट संघाचा चौथा आणि आजवरचा भारतीय टी-२० क्रिकेट संघाचा १३वा कर्णधार बनला. जानेवारी २०२१ पासून ९ जणांनी भारतीय टी-२० क्रिकेट संघाची धुरा सांभाळली आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध हार्दिक पांड्या, ऑगस्टमध्येच आयर्लंडविरुद्ध जसप्रित बुमराह, आशिया स्पर्धेमध्ये ऋतुराज गायकवाड आणि आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार यादव यांनी भारतीय टी-२० क्रिकेट संघाची धुरा सांभाळली आहे.
सूर्यकुमार यादवला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. मालिकेतला दुसरा सामना रविवार २६ नोव्हेंबर रोजी ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियम, तिरुवनंतपुरम येथे संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे.
हे पण वाचा
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.