भारतीय क्रिकेट संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात पराभवाने,टी-२० मध्ये भारताचा सलग तिसरा पराभव.

Spread the love

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भारतीय क्रिकेट संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात पराभवाने झाली. तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पाच विकेट्सने भारताने पराभव स्वीकारला. डर्बनमधील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मध्ये सलग तिसरा पराभव झाला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांना इंदूर आणि पर्थमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर डर्बनमधील सामना पावसामुळे झाला नाही.

भारताने पाच वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेत टी-२० सामना गमावला आहे. त्यांचा शेवटचा पराभव २०१८ मध्ये सेंच्युरियनच्या मैदानावर झाला होता. भारताविरुद्धचा हा सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेने मालिकेत १-० अशी अभेद्य आघाडी घेतली. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना १४ डिसेंबरला होणार आहे. २०१२ मध्ये दक्षिण आफ्रिकेत भारताने शेवटची टी-२० मालिका गमावली होती. त्यावेळी मालिकेत एकच सामना होता. त्यानंतर २०१८ मध्ये भारताने २-१ असा विजय मिळवला होता.

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने सेंट जॉर्ज पार्कवर नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसामुळे खेळ थांबवण्यात आला तेव्हा भारताने १९.३ षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात १८० धावा केल्या होत्या. त्यानंतर टीम इंडिया पुढे खेळू शकली नाही. डकवर्थ लुईस नियमानुसार दक्षिण आफ्रिकेला १५ षटकांत १५२ धावांचे लक्ष्य मिळाले. त्यांनी १३.५ षटकात १५४ धावा करत सामना जिंकला.

आफ्रिकन फलंदाजांनी लक्ष्य सोपे केले. त्यांनी सातत्याने भारतीय गोलंदाजांवर हल्ला चढवला आणि धावगती कमी होऊ दिली नाही. रीजा हेंड्रिक्सने २७ चेंडूंत सर्वाधिक ४९ धावा केल्या. कर्णधार एडन मार्करामने १७ चेंडूत ३० धावांची खेळी केली. डेव्हिड मिलरने १७, मॅथ्यू ब्रिट्झकेने १६, ट्रिस्टन स्टब्सने नाबाद १४ आणि अँडिले फेहलुकवायोने नाबाद १० धावा केल्या. हेन्रिक क्लासेनने सात धावा केल्या. १४व्या षटकातील पाचव्या चेंडूवर फेहलुकवायोने रवींद्र जडेजाच्या चेंडूवर षटकार ठोकला आणि सामना संपवला. भारताकडून मुकेश कुमारने दोन बळी घेतले. मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी एक यश मिळाले.

तत्पूर्वी, रिंकू सिंगने ३९ चेंडूत नाबाद ६८ धावा केल्या. कर्णधार सूर्यकुमार यादवने ५६ धावांची खेळी केली. तिलक वर्माने २९ तर रवींद्र जडेजाने १९ धावा केल्या आहेत. यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल आणि अर्शदीप सिंग यांना खाते उघडता आले नाही. जितेश शर्माला एक धाव काढता आली. मोहम्मद सिराज खाते न उघडता नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिकेकडून गेराल्ड कोएत्झीने तीन बळी घेतले. मार्को जॅनसेन, लिझाद विल्यम्स, तबरेझ शम्सी आणि एडन मार्कराम यांना प्रत्येकी एक यश मिळाले. तबरेझ शम्सीला (१/१८) सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादवने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात शानदार कामगिरी केली. भारतासाठी २००० किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो चौथा फलंदाज ठरला. त्याच्या आधी केएल राहुल (२२५६), रोहित शर्मा (३८५३) आणि विराट कोहली (४००८) आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार