अंमळनेर : बांधकाम साहित्याची वाहतूक करणार्या व्यावसायिकाचा डंपर अडवून ३० हजारांची लाच मागून ती खासगी व्यक्तीच्या माध्यमातून स्वीकारताना जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील पोलीस ठाण्याच्या हवालदारासह खासगी व्यक्तीला धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. या कारवाईमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.हवालदार घनश्याम पवार आणि खासगी व्यक्ती इम्रानखान पठाण अशी अटकेतील लाचखोरांची नावे आहेत.
तक्रारदार हे अमळनेर शहरातील रहिवासी असून, त्यांचा बांधकाम साहित्याचा व्यवसाय आहे. अमळनेर येथील पोलीस ठाण्याचे हवालदार घनश्याम पवार यांनी सात जानेवारीला तक्रारदारांचा डंपर अडवून त्यांच्याकडे पोलीस निरीक्षक विजय शिंदे आणि स्वतःसाठी दरमहा हप्ता म्हणून ३० हजारांची लाच मागितली. अमळनेर येथील संबंधिताने त्याबाबत धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दूरध्वनीवरून संपर्क साधत तक्रार केली. धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांनी नऊ जानेवारी रोजी तक्रारीची पडताळणी केली.
त्यात हवालदार पवार यांनी ३० हजारांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. १० जानेवारी रोजी खासगी व्यक्ती इम्रानखान पठाण याच्याकडे लाचेची रक्कम देण्याचे हवालदार पवार यांनी सांगितल्यानंतर पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, रूपाली खांडवी, राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागूल, मकरंद पाटील, रामदास बारेला, संतोष पावरा, प्रवीण मोरे, प्रवीण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांच्या पथकाने अमळनेर येथे सापळा रचला. सुरुवातीला खासगी व्यक्ती इम्रानखान आणि नंतर हवालदार पवार यांना पथकाने अटक केली. याप्रकरणी अमळनेर येथील शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतंबिध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे पण वाचा
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम