यावल : तालुक्यातील रिधुरी या गावात सोमवारी (दि.१५) घराच्या वापरच्या रस्त्यावरून वाद होत दोन कुटुंबामध्ये हाणामारी झाली. यात एका ५० वर्षीय इसमाच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून त्याचा खून करण्यात आला असून या हाणामारीत एक दांपत्य गंभीर जखमी झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच फैजपूर पोलिसांचे पथक तातळीने घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह आणी जखमींना यावल ग्रामिण रूग्णालयात आणले असुन जखमींची प्रकृती चिंताजणक असल्याने दोघांना जळगाव हलवण्यात आले आहे.
रिधुरी ता. यावल या गावात सोमवार रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घराच्या वापरच्या रस्त्यावरून दोन कुटुंबांमध्ये वाद झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत धनराज वासुदेव सोनवणे वय ५० यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करण्यात आला यात धनराज सोनवणे हे जागीच ठार झाले तर सतीश सुखदेव सोनवणे वय ३० व आरती सतीश सोनवणे वय २८ या दांपत्याला जबर दुखापत झाली आहे या हाणामारीची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी फैजपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ, हवालदार राजेश बऱ्हाटे, देविदास सूरदास, विकास सोनवणे, उमेश चौधरी, रवींद्र मोरे, विजय चौधरी, अरुण नमायते हे दाखल झाले व त्यांनी मृतदेह व जखमी यांना यावल ग्रामीण रुग्णालयात आणले.
जखमींवर यावल ग्रामीण रुग्णालयात डॉ. प्रशांत जावळे, डॉ. इरफान खान, अधिपरिवारीका माधुरी ठोके, आतिश खडके, चेतन भोईटे आदींनी प्रथम उपचार केले. तर जखमी या दांपत्याची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले. या हाणामारी कोणी कोणाला मारलं याबाबत रात्री उशिरापर्यंत फैजपूर पोलीस तपास करीत होते व गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.