जळगाव:- कोणत्याही प्रशासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्याने आपल्या पदाचा दुरुपयोग करुन कार्यालयातच मद्यपान करावं हे कितपत योग्य आहे? असा प्रश्न सध्या अमळनेरमध्ये उपस्थित केला जातोय. याबाबत अमळनेरसह जळगाव जिल्ह्यात चांगलीच चर्चा सुरु आहे. काही जण संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. या अधिकाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरलही होत आहे. विशेष म्हणजे संबंधित अधिकारी ज्या कार्यालयात कार्यरत आहे ते कार्यालय अतिशय महत्त्वाचं आहे. आपातकालीन परिस्थितीत किंवा संकट काळात या कार्यालयाची अतिशय मौल्यवान अशी मदत होते. असं असताना संबंधित अधिकाऱ्याला आपल्या जबाबदारीची जाणीव नसणं हे खरंच विशेष आहे.
नेमकं प्रकरण काय?
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर नगरपरिषदेच्या अग्निशमन कार्यालयातला अधिकारी दारू पित असल्याचा व्हिडीओ एका तरुणाने आपल्या मोबाईलमध्ये चित्रीत केलाय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. अमळनेर शहरातील परेश उदेवाल नामक तरुणाने काही दिवसांपूर्वी त्याच्या मोबाईलमध्ये हा व्हिडीओ चित्रीत केल्याचं सांगितलं जातंय. हा प्रकार समोर आणल्यानंतर त्याने नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती. पण त्या मुजोर अधिकाऱ्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाहीये. म्हणून तक्रारदार परेश उदेवाल याने उपोषणाचा इशारा देखील दिला आहे.
परेश उदेवाल तरुण अग्निशमन दलाच्या कार्यालय परिसरात जातो. तो तिथे कार्यालयात मद्याचा पेला भरणाऱ्या एका अधिकाऱ्याला रंगेहात पकडतो. तो संबंधित प्रकार कॅमेऱ्यात कैद करतो. यावेळी अधिकारी जे करायचं ते कर, असं त्या तरुणाला उत्तर देतो. संबंधित व्हिडीओ अवघ्या काही सेकंदांचा आहे. पण या व्हिडीओत तरुणाला जे दाखवायचं आहे ते स्पष्टपणे दिसत आहे. अधिकारी काय करत आहे ते दिसून येत आहे. त्यामुळे आता या प्रकरणी काही कारवाई होते का? किंवा इतर काय हालचाली घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हे पण वाचा
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
- पतीच्या उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूनंतर तीन तासांत पत्नीने संपवली जीवन यात्रा; दोघांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार
- सोशल मिडीयावर माळी समाजावरील आक्षेपार्ह मजकुराच्या निषेधार्थ एरंडोल बंद; माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या पुतळ्याचे दहन.
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि.२१ नोहेंबर २०२४