मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : रांची येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी सामना खेळवला जात आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर इंग्लंडने सात गडी गमावून ३०२ धावा केल्या आहेत. सध्या जो रूट १०६ आणि ऑली रॉबिन्सन नाबाद ३१ धावांवर नाबाद आहेत. दोघांमध्ये ५७ धावांची भागीदारी झाली आहे. आज (२३ फेब्रुवारी) पहिले सत्र भारताच्या नावावर होते. वेगवान गोलंदाज आकाशदीपने भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतील चौथ्या सामन्यात कसोटी पदार्पण केले. आकाशदीपने इंग्लंडच्या बेन डकेट (११), ऑली पोप (०) आणि जॅक क्रॉली (४२) यांना तंबूमध्ये पाठवले. यानंतर फिरकीपटूंची पाळी आली. अश्विनने जॉनी बेअरस्टो आणि रवींद्र जडेजाने बेन स्टोक्सला बाद करून इंग्लंडचा अर्धा संघ तंबूमध्ये पाठवला. बेअरस्टो ३८ तर स्टोक्सला तीन धावा करता आल्या.
भोजन अवकाशापर्यंत पहिल्या सत्रात इंग्लंडने पाच विकेट गमावून ११२ धावा केल्या होत्या. यानंतर दुसऱ्या सत्रात म्हणजेच चहापानाच्या वेळेपर्यंत जो रूट आणि बेन फॉक्स यांनी एकही विकेट पडू दिली नाही. त्या सत्रात दोघांनी मिळून ८६ धावा जोडल्या. चहापानाच्या वेळेनंतर सिराजने टीम इंडियामध्ये पुनरागमन केले. त्याने रूट आणि फॉक्सची ११३ धावांची भागीदारी मोडली. फॉक्सचे अर्धशतक हुकले. तो ४७ धावा करून सिराजच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्याचवेळी टॉम हार्टले १३ धावा करून सिराजच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. रूटने आपल्या कसोटी कारकिर्दीतील ३१ वे शतक झळकावले. त्याने ऑली रॉबिन्सनसह इंग्लंडचा डाव सांभाळला आहे. भारताकडून आतापर्यंत आकाशने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या आहेत. त्याचवेळी सिराजला दोन विकेट मिळाल्या. रवींद्र जडेजा आणि अश्विनला प्रत्येकी एक विकेट मिळाली. तिसऱ्या सत्रात इंग्लंडने २९ षटकांत दोन गडी गमावून १०४ धावा केल्या.
आकाशदीप कोण आहे?
बंगालचा वेगवान गोलंदाज आकाशदीपने रांची येथे इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या २७ वर्षीय खेळाडूने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्यात प्रवेश करताच आश्चर्यकारक कामगिरी केली. त्याने इंग्लंडच्या पहिल्या डावात पहिले तीन विकेट घेत खळबळ उडवून दिली. अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या जागी आकाशला खेळण्याची संधी मिळाली. बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. आकाशने कर्णधार रोहित शर्माचा विश्वास खरा ठरवत संस्मरणीय कामगिरी केली.
राष्ट्रीय संघातून खेळण्याचा प्रवास आकाशसाठी सोपा राहिलेला नाही. मूळचा बिहारचा असलेल्या या खेळाडूने आयुष्यात संघर्षाचे अनेक कालखंड पाहिले आहेत. कधी वडील आणि भावाच्या निधनाने तो उद्ध्वस्त झाला तर कधी आर्थिक विवंचनेमुळे त्याला क्रिकेट सोडावे लागले. आकाशच्या वडिलांना त्याला सरकारी नोकरीत बघायची इच्छा होती. त्याने अनेक परीक्षाही दिल्या, पण क्रिकेट त्याच्या मनात कायम होते. त्याला अभ्यासात फारसा रस वाटला नाही. तो क्रिकेटसाठी जास्त वेळ काढायचा. लहानपणी लोक त्याला टोमणे मारायचे. त्याच्या मित्रांचे कुटुंबीय देखील त्याच्याबद्दल वाईट बोलायचे. मुलांना त्यांच्यापासून दूर राहण्याचा सल्ला देत असत. भारतीय वेगवान गोलंदाजाने सांगितले की, लोक म्हणायचे की आकाशपासून दूर राहा. त्याच्या सहवासात राहून तुम्ही बिघडून जाल. मात्र, आकाश कोणावरही टीका करत नाही.
आकाशसाठी २०१५ हे त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण वर्ष होते. सहा महिन्यांच्या कालावधीत त्याने वडील आणि भाऊ दोघांनाही गमावले. वडिलांचा पक्षाघाताने मृत्यू झाला. त्याचवेळी दोन महिन्यांनी त्याच्या भावानेही हे जग सोडले. आकाशच्या घरात आर्थिक चणचण भासू लागली. त्याने आईला सावरले. याच काळात त्याने तीन वर्षे क्रिकेट सोडले. नंतर आकाशला वाटले की, तो क्रिकेटपासून फार काळ दूर राहू शकत नाही. यानंतर तो दुर्गापूरला गेला. तेथून पुन्हा कोलकाता गाठले. एका छोट्याशा खोलीत भावासोबत राहू लागला. आकाश नेहमी त्याच्या मित्राचे आभार मानतो. मित्राने त्याला वाईट काळात खूप मदत केली. त्याला दुर्गापूरमध्ये क्लब क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. टेनिस बॉल क्रिकेटमधून त्याचे अर्थाजन होत होते. काकांनीही दुर्गापूरला खूप मदत केली. त्यांनी आकाशला अडचणीतून बाहेर काढले आणि क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्याची प्रेरणा दिली. आकाशने २०१९ मध्ये बंगालसाठी पहिला प्रथम श्रेणी सामना खेळला. त्याच वर्षी त्याला लिस्ट ए आणि टी-२० फॉरमॅटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये येण्यापूर्वी आकाशने बंगालकडून ३० प्रथम श्रेणी सामने खेळला आहे. या काळात त्याने १०४ विकेट घेतल्या. त्याच्या नावावर २८ लिस्ट ए सामन्यात ४२ विकेट आहेत. त्याचबरोबर त्याने ४१ टी-२० सामन्यांमध्ये ४८ विकेट्स घेतल्या आहेत. आकाश आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (आरसीबी) संघाकडून खेळतो. त्याने संघासाठी सात सामन्यांत सहा विकेट घेतल्या आहेत.
हे पण वाचा
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
- पतीच्या उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूनंतर तीन तासांत पत्नीने संपवली जीवन यात्रा; दोघांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार
- सोशल मिडीयावर माळी समाजावरील आक्षेपार्ह मजकुराच्या निषेधार्थ एरंडोल बंद; माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या पुतळ्याचे दहन.
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि.२१ नोहेंबर २०२४