इंदूर :- आपल्या प्रियकराच्या प्रेमापोटी आयुष्यात वाटेल ते करण्याची धमक अनेक युवक/युवती ठेवतात. घर, नौकरी, समाज सोडण्यापासून ते अगदी जवळच्या लोकांसोबत नातेसंबंध तोडण्यापर्यंतची मजल प्रेमीयुगलात असते.पण इंदूरमध्ये मात्र प्रियकराने चक्क लिंगबदल करून आपल्या प्रेमासाठी मुलगी बनण्याचा चंग बांधला आणि तडीस नेलाही. पण ज्या प्रियकरासाठी एवढा अट्टाहास केला, त्या प्रियकराने आता शेवटच्या टप्प्यात लग्नासाठी नकार दिला आहे. या प्रकरणात पोलिसांत तक्रार देण्यात आली असून इंदूर पोलिसांनी विविध कलमाच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे.
“मी सर्व वैद्यकीय शस्त्रक्रिया पूर्ण केल्या आणि निसर्गाच्या विरोधात जाऊन मुलाची मुलगी झाले. गेल्या तीन वर्षात मी याकरिता 45 लाख रुपये खर्च केले. येत्या जुलै महिन्यात माझी शेवटची शस्त्रक्रिया आहे पण, मी हे सर्व ज्याच्यासाठी केले, तोच मला सोडून गेला आहे. माझ्यासमोर आता आत्महत्येशिवाय पर्याय नाही…” ही दुःखद भावना व्यक्त केली आहे मध्य प्रदेशच्या इंदूरमधील व्यवसायाने फॅशन डिझायनर असलेल्या 28 वर्षीय रजनीने (आता नाव बदललेले).
नेमकं प्रकरण काय?
रजनीने हिंदी वृत्तवाहिनी आज तकशी बोलताना सांगितले की, इंस्टाग्रामवर तिची एका मुलाशी ओळख झाली. पुढे काही दिवसांनी मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. प्रियकराने मुलगा असूनही रजनीबद्दल प्रेम व्यक्त केले. त्यालाही माझ्यासारखं मुलांबद्दलचं आकर्षण आहे, असे त्यानं सांगितलं. तेव्हा मीही मुलगाच होतो. त्याने मला लिंगबदल शस्त्रक्रिया करण्यास सांगितले. त्याच्या प्रेमभावनेला भाळून रजनीने लिंगबदल शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. प्रियकरानेही या निर्णयाला सुरुवातीला होकार दिला.
शस्त्रक्रिया झाल्यावर आपण दोघे लग्न करू, असेही तो म्हणाला. घरातल्यांनी लग्नाला नकार दिला तर आपण दोघे इंदूरमध्ये वेगळे राहू, असेही तो म्हणाला. रजनीने पुढे सांगितले, “प्रियकराने माझ्या लिंगबदल शस्त्रक्रियेच्या निर्णयाला संमती दिल्यानंतर मी लिंगबदल शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केली. शस्त्रक्रियेच्या टप्प्याटप्प्याने केस आणि इतर अवयवांची शस्त्रक्रिया पूर्ण होत असतानाच मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्याने अचानक माझ्याशी बोलणं बंद केलं. मला भेटण्याची टाळाटाळ करू लागला. त्याचा मोबाइलही बंद झाला होता.
ज्या इन्स्टाग्राम आयडीवरून आम्ही बोलत होतो, तोही बनावट असल्याचं लक्षात आलं. त्याने ग्वाल्हेरचा पत्ता दिला होता, तोही खोटा निघाला.”पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी प्रियकर हा उत्तर प्रदेशच्या कानपूर येथील रहिवासी आहे. त्याने लग्नाचे वचन देऊन रजनीला लिंगबदल शस्त्रक्रिया करण्यास सांगितले होते. पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी प्रियकराविरोधात भारतीय दंड विधान कलम 377 (अनैसर्गिक लैंगिक संबंध) आणि 506 (गुन्हेगारी हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे, अशी बातमी एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






