लखनौ सुपर जायंट्सचा रोमहर्षक विजय

Spread the love

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज्स यांच्यात मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर टाटा आपीएल २०२२ चा सातवा सामना रोमहर्षक लढतीत लखनौने जिंकला. लखनौने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. चेन्नई कडून खेळाची सुरूवात करायला रॉबीन उथप्पा आणि ऋतुराज गायकवाड उतरले. रॉबीनची देहबोली आज आक्रामक दिसत होती आणि खेळपट्टीवर तो आग ओकत होता. केवळ १५ चेंडूंत ह्या दोघांनी २८ धावा संघांच्या खात्यावर जोडल्या होत्या. त्यापैकी ४ चेंडूंत केवळ १ धाव ऋतुराजने काढली होती. अॅण्ड्र्यूच्या गोलंदाजीवर ऋतुराज विरुद्ध पायचितसाठी पंचांकडे दाद मागितलेली असताना त्याने चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. रॉबीनने त्याला परत जाण्यासाठी सांगितले. पण तोपर्यंत रवी बिशनोईने चेंडूवर झडप घालून थेट यष्टीचा वेध घेतला आणि ऋतुराज धावबाद झाला. रॉबीन आणि मोईन अलीने सामन्याची सूत्र आपल्या हातात घेतली आणि पुढच्या ५ षटकांत संघाच्या खात्यावर ५०पेक्षा जास्त धावा जमा केल्या. ८व्या षटकात रवी बिशनोईने रॉबीनला पायचित टिपले पण रॉबीनने बाद होण्याआधी आपली भूमिका योग्यप्रकारे निभावली होती. त्याने ८ चौकार आणि १ षटकारांच्या सहाय्याने २७ चेंडूंत ५० धावा काढल्या. मोईन अली आणि शिवम दुबे यांनी डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. पण मोईन अली आवेश खानचा चेंडू चुकीच्या पद्घतीने मारण्याच्या नादात त्रिफाळाचीत झाला. त्याने ४ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने २२ चेंडूंत ३५ धावा काढल्या. शिवम दुबे आणि अंबाती रायडूने डावाची सूत्र सांभाळली. दोघेही गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत होते. पण आजचा दिवस रवी बिशनोईचा होता. त्याने रायडूच्या यष्ट्या उध्वस्त केल्या. रायडूने २ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने २० चेंडूंत २७ धावा काढल्या. यंदाच्या हंगामात चेन्नईचं कर्णधारपद सांभाळणारा रवींद्र जडेजा मैदानात उतरला. येथेच्छ फलंदाजी करणार्‍या दुबेला अर्धशतकासाठी एका धावेची गरज असताना इव्हिन लुईसने आवेश खानच्या गोलंदाजीवर त्याचा झेल टिपला. जडेजा आणि धोनी झटपट धावा जमवण्याकरिता ठेवणीतले फटके मारू लागले. पण इतक्यात डीप मिड विकेटवर मनीष पांडेने अॅण्ड्र्यूच्या गोलंदाजीवर जडेजाला टिपले. जडेजाने ३ चौकारांच्या सहाय्याने ९ चेंडूंत १७ धावा काढल्या. धोनीने २ चौकार आणि १ षटकारांच्या सहाय्याने ६ चेंडूंत बिनबाद १६ धावा काढल्या. २० षटकांचा खेळ संपल्यानंतर चेन्नईच्या खात्यावर २१०/७ धावांचा डोंगर झाला होता.

लखनौ सुपर जायंट्सच्या डावाची सुरूवात कर्णधार के. एल. राहुल आणि क्विंटन डीकॉक यांनी केली. राहुल आक्रमक तर डीकॉक सावध भूमिका घेऊन डावाला आकार देत होते. संघाच्या खात्यावर धावा जमा होत होत्या पण आवश्यक धावगती चेंडूगणिक वाढत होती. ११व्या षटकाच्या सुरूवातीला ड्वेन प्रिटोरियसने अंबाती रायडूकडे झेल देण्यास प्रवृत्त केले आणि चेन्नईने पहिला बळी मिळवला. राहुलने २ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने २६ चेंडूंत ४० धावा काढल्या. धावफलक ९९/१ दर्शवत होता. लखनौला ५८ चेंडूंत विजयासाठी ११२ धावांची गरज होती. मनीष पांडे जेमतेम १ षटक खेळपट्टीवर थांबला. त्याला तुषार देशपांडेने ड्वेन ब्राव्हो कडे झेल देण्यास भाग पाडले. ईव्हिन लुईस नावाचं वादळ खेळपट्टीवर आलं आणि डीकॉकच्या सोबतीने त्याने सामन्यात रंग भरायला सुरूवात केली. १५व्या षटकात ड्वेन प्रिटोरियसच्या चेंडूंवर मोठा फटका मारायच्या नादात डीकॉकने मारलेला फटका उंच हवेत गेला आणि धोनीने आपलं काम चोख निभावलं. डीकॉकने ९ चौकारांच्या सहाय्याने ४५ चेंडूंत ६१ धावा काढल्या. धावफलक १३९/३ दर्शवत होता. लखनौला ३२ चेंडूंत विजयासाठी ७२ धावांची गरज होती. अजूनदेखील चेन्नईच्या हातात सामना होता. दीपक हुडाने झटपट धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न १ चौकार १ षटकार मारून त्याने ८ चेंडूंत १३ धावा काढल्या. ड्वेन ब्राव्होच्या गोलंदाजीवर रवींद्र जडजाने त्याला झेल टिपला. ब्राव्हो हा बळी घेऊन आयपीलच्या इतिहासात जास्तीतजास्त बळी मिळवणार्‍यांच्या यादीत प्रथम क्रमांकावर पोहचला. १८व्या षटकात १७१/४ धावसंख्या असताना आयुष बदोनी आणि लुईसने रोद्र रुप धारण केले. शिवम दुबेच्या १९व्या षटकात पहिल्याच चेंडूवर आयुषने षटकार मारून त्याची लय बिघडवली. दुबेचे पुढचे दोन चेंडू पंचानी स्वैर घोषित केले. आयुषने सावधपणे १ धाव काढून लुईसला फलंदाजी दिली. लुईस जणू ह्या क्षणाचीच वाट बघत होता. त्याने षटकाच्या तिसर्‍या चेंडूंवर दोन धावा काढल्या. त्यानंतर लागोपाठ दोन चौकार मारले. षटकाच्या शेवटच्या चेंडूंवर त्याने सणसणीत षटकार लगावताना स्वतःच अर्धशतक आणि संघाचं द्विशतक धावफलकावर नोंदवलं. जडेजाने लखनौला विजयासाठी ९ धावांची गरज असताना मुकेश चौधरीकडे चेंडू दिला. द्विधा मनःस्थितीत असलेल्या मुकशने दोन स्वैर चेंडू टाकले. आयुषने त्याच्या मनावर ताबा मिळवत चेंडूची दिक्षा ओळखली आणि डीप स्वेअर लेगला जबरदस्त षटकार लगावला. शेवटच्या ५ चेंडूंत केवळ एका धावेची गरज असताना आयुषने पुढील चेंडू खेळून काढला. आणि पुढच्याच चेंडूवर १ धाव घेऊन विजयाची औपचारिकता पूर्ण केली. शेवटच्या १३ चेंडूंत ह्या दोघांनी ४० धावा कुटल्या. १९.३ षटकांत लखनौने २११/४ आपल्या खात्यावर नोंदवल्या आणि ६ गडी राखून मोठा विजय प्राप्त केला. लखनौने आपला पहिला विजय मिळवला तर चेन्नई सलामीचे दोन्ही सामने गमावून बसला आहे. रवींद्र जडेजावर टाकलेला कर्णधार पदाचा भार त्याला अजूनदेखील पेलता आलेला नाही.
ईव्हिन लुईसला सामन्याचा खेळाहू हा बहुमान देण्यात आला. त्याने केवळ २३ चेंडूंत बिनबाद ५५ धावा काडल्या.

उद्याचा सामना कोलकत्ता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज्स इलेवन यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत एक एक सामना जिंकला आहे. पंजाबला दुसरा विजय मिळवायचा आहे. तर कोलकत्याला पुन्हा विजयाच्या मार्गावर येण्याची गरज आहे. पंजाबचे पारडे जरी जड दिसत असले तरीही कोलकत्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

टीम झुंजार