पुणे – विवाह संकेतस्थळावर खोटी माहिती टाकून विवाह इच्छुकाची सुमारे तब्बल 9 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी महिलेला कोरेगाव पार्क पोलिसांनी गोवा येथून अटक केली. दरम्यान तिला न्यायालयात हजर केले. त्यावेळी 4 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बिराजदार यांनी दिला आहे. 47 वर्षीय महिलेने फसवणूक केल्याप्रकरणी बंडगार्डन रोड येथील 36 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे.
हा प्रकार मे ते ऑक्टोबर 2021 या कालावधीत घडला. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील दिलीप गायकवाड यांनी बाजू मांडली. तिने जीवन साथी डॉट कॉमवर खोटे प्रोफाईल बनविले. फिर्यादींशी ओळख करून लग्नाचे अमिष दाखविले. त्यानंतर तिची प्रॉपर्टी तिच्या नावावर करण्यासाठी कोर्ट, वकील खर्च, क्रिटीकल मेडिकल कंडिशनकरीता म्हणून वेळोवेळी पैसे ऑनलाईन ट्रान्सफर करायला लावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.तिला अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यावेळी फसवणूकीच्या रक्कमेपैकी 5 लाख 5 हजार रुपये गोठविण्यात आले आहेत. उर्वरित 4 लाख 19 हजार रुपये जप्त करण्यासाठी, तसेच तिचे कोणी साथीदार आहेत का, या शोधासाठी तिला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील ऍड. दिलीप गायकवाड यांनी केली.