खासगी रुग्णालयातील ‘ब्रदर’ने बदनामी व मुलांना जिवे मारण्याची धमकी देत ‘सिस्टर’वर केला अनेकदा लैंगिक अत्याचार.

Spread the love

बुलडाणा :- विदर्भातील बुलडाणा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बुलढाणा शहरातील एका खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करणाऱ्या 32 वर्षीय महिलेला त्याच रुग्णालयात ब्रदर म्हणून काम करणाऱ्या 23 वर्षी तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.नराधमाने नंतर पीडितेला बदनामी व मुलांना जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केला.या प्रकरणी आरोपी तरुणाविरुद्ध बुलडाणा शहर पोलिस स्टेशनमध्ये बलात्कार व ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

बुलडाणा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विशाल गजानन बोराडे (वय 23, रा.बुलडाणा) असे आरोपीचे नाव आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर आरोपीच्या विरुद्ध बलात्कार व ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पीडित महिला शहरातील रहिवासी असून ती एका खासगी दवाखान्यात परिचारीका म्हणून काम करत होती. यादरम्यान, रुग्णालयात ब्रदर म्हणून काम करत असलेल्या आरोपी विशाल गजानन बोराडे याने पीडितेसोबत जवळीक साधली. त्यानंतर दोघांचे एकमेकांच्या घरी जाणं-येणं सुरू झालं.

दरम्यान 1 जून 2021 ते 29 फेब्रुवारी 2024 या दरम्यान आरोपीने पीडितेला बदनामी करण्याची व तिच्या मुलांना जीवे मारण्याची धमकी दिली. नंतर तिची इच्छा नसताना तिच्यासोबत शरीर संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर आरोपीने पीडितेला ब्लॅकमेल करून तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केला.अखेर नराधमाच्या छळाला कंटाळून पीडितेने पोलिस स्टेशन गाठून आपबिती सांगितली. पीडितीच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी नराधम विशाल बोराडे यांच्याविरुद्ध बलात्कार व ॲट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील हे करीत आहेत.

अकोल्यात व्यापाऱ्याची सुखरूप सुटका..

दुसऱ्या एका घटनेत, एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण झालेल्या एका व्यापाऱ्याची पोलिसांनी सुखरुप सुटका केली आहे. ही घटना अकोला येथील आहे. अकोल्यातील रिकाम्या काचेच्या बाटल्यांचे प्रसिद्ध व्यापारी अरुण वोरा यांचे दोन दिवसांपूर्वी रायली जीन परिसरातून अज्ञात आरोपीने अपहरण केले होते.या घटनेमुळे अकोला शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

अपहरणकर्ता निघाला जवळचाच…

अकोला पोलिसांनी सापळा रचून व्यापारी अरुण वोरा यांची सुखरुप सुटका केली. या प्रकरणात आतापर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात आली असून दोन आरोपी अद्याप फरार आहेत. पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत. अपहरणकर्त्यांमध्ये एक आरोपी हा अरुण वोरा यांच्या कारखान्यातील कामगार आहे. तो अनेक वर्षांपासून अरुण वोरा यांच्याकडे काम करत होता. आरोपींनी वोरा यांना डोळ्यावर पट्टी आणि हाथ पाय बांधून गाडीत बसवून शहरालगतच्या भागात फिरवून मध्यरात्री शहरातीलच चिव चिव बाजारात रात्रभर ठेवले.शहरापासून 15 किलोमिटर असलेल्या कान्हेरी सरप या गावात एका ठिकाणी कोंबून ठेवले होते.

मात्र, या काळात आरोपींना वोरा यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधता आला नाही. त्यामुळे ते खंडणीची मागणी सुद्धा करू शकले नाही. शेवटी पोलिस आपल्यापर्यंत पोहचणार या भीतीने बुधवारी रात्री आरोपींनी अरुण वोरा यांना एका ऑटोत बसवून घरी पाठवले. घरी आलेल्या वोरा यांच्या जबाबावरुन गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 5 आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. तसेच या गुन्ह्यात वापरण्यात आलेली कार आणि मोटर सायकल जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणाती दोन आरोपी अद्याप फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी दिली आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार