अहमदनगर :- प्रवरा नदीत बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्यासाठी पाण्यात उतरलेल्या SRDF पथकाची बोट उलटली आणि होत्याच नव्हतं झालं. धुळ्याहून आलेल्या SDRF च्या जवानांवर काळाने घाला घातला असून तीन जवानांसह तिघा नागरीकांनी अहमदनगर जिल्ह्यातील नदीच्या बंधाऱ्यात जिव गमावला आहे.अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक गावाजवळील प्रवरा नदी पात्रात SDRF पथकाचे 5 जवान आणि त्यांच्या मदतीला एक स्थानिक नागरिक बोट घेऊन पाण्यात उतरले. पाण्यात भोवरा निर्माण होऊन SDRF पथकाची बोट पलटली आणि पाहताक्षणी सहाही जण पाण्यात बुडाले. यातील पाच जवानांना बाहेर काढण्यात आले. मात्र, तिघा जवानांनी जीव गमावला तर दोघांचे प्राण वाचले आहे.
शोधायला आले अन् जीव गमावला
22 मे ला दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील अर्जुन रामदास जेडगुले (वय 18 वर्षे) आणि सिन्नर तालुक्यातील सागर पोपट जेडगुले (वय 25 वर्षे) हे दोन तरुण अंघोळीसाठी सुगाव बुद्रुक जवळील प्रवरा नदी पात्रात आले होते. अंघोळ करताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेजण बुडाले. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी सागर पोपट जेडगुले याचा मृतदेह बाहेर काढला. मात्र, अर्जुन जेडगुले याचा शोध लागला नव्हता. 23 मे ला सकाळी धुळे येथून SDRF च्या पथकाला पाचारण करण्यात आले. SDRF च्या जवानांचं शोधकार्य सुरु झालं. आणि त्याच ठिकाणी 6 जनांची बोट उलटून ते पाण्यात बुडाले. SDRF च्या इतर जवानांनी त्यांना वाचवण्यासाठी दुसरी बोट पाण्यात उतरवली.
जीवाची बाजी लाऊन SDRF चे जवान सर्वांना वाचवण्याचे प्रयत्न करीत होते. मात्र, निसर्गाच्या पुढे कोणाचे काहीच चालले नाही. दुसऱ्याला शोधायला आलेल्या जवानांनी आपला जीव धोक्यात घातला आणि दुर्दैवाने त्यांचाच जीव गेला. यामध्ये SDRF चे PSI प्रकाश नाना शिंदे, कोन्स्टेबल राहुल गोपीचंद पावरा, DRIVER वैभव सुनील वाघ यांचा कर्तव्य बजावत असताना पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर कॉन्स्टेबल पंकज पंढरीनाथ पवार, कॉन्स्टेबल अशोक हिम्मतराव पवार यांना पाण्यातून बाहेर काढण्यात यश आलं. त्यांची प्रकृती स्थिर असून ते उपचार घेत आहेत. तर SDRF च्या मदतीला गेलेले सुगाव बुद्रुक येथील स्थानिक गणेश मधुकर देशमुख आणि 22 मे ला बुडालेला तरूण अर्जुन रामदास जेडगुले यांचा शोध अजूनही सुरू आहे.
मदतीला गेला तो कायमचाच गेला. आपल्या डोळ्यादेखत सहकाऱ्यांना बुडतानाचा हा थरारक प्रसंग जीवाला हादरून टाकणारा होता. घटनास्थळी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. किरण लहामटे, खासदार सदाशिव लोखंडे यांनी येऊन घटनेची पाहणी केली. संपूर्ण महाराष्ट्राला हळहळ करायला लावणारी ही घटना आहे.SDRF च्या मदतीला गेलेला स्थानिक गणेश मधुकर देशमुख आणि अर्जुन जेडगुले याचा शोध अद्याप सुरू आहे. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देखील घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.
राज्य आपत्ती व्यवस्थापन पथकाचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत मयत जवानांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर विखे पाटील यांनी गणेश देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि आर्थिक मदतीसह वेगाने शोधकार्य करण्याची सुचना प्रशासनाला दिली. दुसऱ्यांसाठी आपला जीव धोक्यात घालून प्राणाची आहुती देणाऱ्या SDRF च्या जवानांनाच आज आपला प्राण गमवावा लागल्याने मोठी हळहळ व्यक्त होत आहे. अजूनही बेपत्ता असलेल्या दोघांचा शोध घेण्यासाठी TDRF ची टिम पोहचणार आहे.