राष्ट्रीय महामार्गावर चाकूचा धाक दाखवत भर दुपारी एक लाखाची लुट, चोरट्यांना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान, एरंडोल येथील घटना.

Spread the love

एरंडोल :- राष्ट्रीय महामार्गावर बँकेत भरणा करण्यासाठी जात असलेल्या कर्मचा-याची मोटार सायकल अडवून अज्ञात चोरट्यांनी सुमारे एक लाख रुपयांची रोकड लुटल्याची घटना भरदुपारी एक वाजेच्या सुमारास घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.कर्मचा-याच्या लुटीचा थरार सीसीटीव्ही कॅमे-यामध्ये चित्रित झाला असून चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

याबाबत माहिती अशी,की राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या हॉटेल कृष्णा समोरील महाजननगराजवळ पद्मालय गॅस एजन्सीचे कार्यालय आहे.कार्यालयातील सहाय्यक व्यवस्थापक राजेंद्र पाटील हे गॅस एजन्सीचे ४ लाख ९१ हजार रुपये दुपारी एक वाजेच्या सुमारास सेन्ट्रल बँकेत भरण्यासाठी मोटरसायकलने जात होते. राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या डिव्हायडरजवळ राजेंद्र पाटील आले असता त्याठिकाणी पूर्वीपासून दबा धरून बसलेल्या बिनानंबर असलेल्या मोटारसायकलवर आलेल्या दोन तरुणांनी त्यांची मोटारसायकल अडवून त्यांच्या ताब्यात असलेली पिशवी हिसकावण्याचा प्रयत्न
केला.

राजेंद्र पाटील यांनी चोरट्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी चोरट्यांनी पाटील यांना चाकूचा धाक दाखवला.राजेंद्र पाटील व चोरट्यांमध्ये झालेल्या झटापटीत राजेंद्र पाटील यांच्या पिशवीतून पाचशे
रुपयांचे दोन बंडल रस्त्यावर पडल्यामुळे चोरट्यांनी एक लाख रुपयांचे पडलेले बंडल घेवून पोबारा केला.यावेळी झालेल्या जातापटीत राजेंद्र पाटील यांच्या हाताला जखम झाली.चोरट्यांचा लुटीचा थरार सीसीटीव्हीच्या
कॅमे-यामध्ये कैद झाला आहे.राजेंद्र पाटील यांची चोरट्यांशी झटापट होत असतांना राष्ट्रीय महामार्गावरून वाहनाची वाहतूक सुरु असतांना देखील त्याठिकाणी वाहनचालक थांबले नसल्याचे सीसीटीव्ही कॅमे-यात दिसत आहे.

राजेंद्र पाटील यांनी प्रसंगावधान राखत प्रतिकार केल्यामुळे पिशवीतील ३ लाख ९१ हजार सुरक्षित राहिले.अज्ञात चोरटे काळ्या रंगाच्या क्रमांक
नसलेल्या बजाज डिस्कव्हर मोटार सायकलवर आले होते.दोन्ही चोरटे ३५ ते चाळीस वयोगटातील असून त्यांनी चेहरा रुमालाने बांधला होता.याबाबत
राजेंद्र पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सतीश
गोराडे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे तपास करीत आहे.दरम्यान भर दुपारी राष्ट्रीय महामार्गावर एक लाख रुपयांची लुट झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार