.
कोपरगाव प्रतिनिधी –कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील एका आदिवासी चिमुरड्याचा खून करून त्याला परस्पर दफन केल्याने कोपरगाव तालुक्यात नरबळीची चर्चा सुरू होती. मात्र, पोलिस तपासाअंती ही अफवाच निघाली.
तालुक्यातील चासनळी शिवारातील तीनचारी परिसरातील विलास चांदगुडे यांच्या वस्तीवर चंदर उर्फ चंद्रभान देवराम गोधडे (वय 50) हा आपल्या मुलीचा मुलगा अथर्व अनिल गायकवाड (वय 6) याच्यासमवेत मजुरीने काम करून राहत होता. गुरूवारी रात्री किरकोळ कारणावरून चंद्रभान गोधडे याने नातू अथर्व याला रात्री दहा वाजता अचानक हाताने व लाकडी काठीने मारहाण केली. मारहाण करताना अथर्व याच्या अवघड जागी मार लागल्याने तो निपचित पडला. सकाळी आजोबाने अथर्वला झोपेतून उठवला असता तो मयत झाल्याचे त्याच्या लक्षात आले. घाईघाईत पुरावा नष्ट करण्यासाठी चासनळी येथील गोदावरी नदीतील काटवनात खड्डा खोदून अथर्वचा मृतदेह गुंडाळून दफन केला.
या घटनेची माहिती गावात पसरली. आजोबा हा मांत्रिकाचे काम करत असल्याने तसेच 31 मार्चची रात्र ही अमावस्येची रात्र असल्याने मयत अथर्व याचा नरबळीतून खून झाला असावा, अशी चर्चा सुरू झाली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कृष्णा चांदगुडे यांनी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्याशी चर्चा करून छडा लावण्याची विनंती केली.
पोलीस निरीक्षक जाधव यांनी या घटनेची मिाहती तहसीलदार विजय बोरुडे यांना दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड हे आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी जाऊन आरोपी चंद्रभान गोधडे याला ताब्यात घेऊन मयत अथर्व याचा मृतदेह दफन केलेल्या ठिकाणी घेऊन गेले.
ग्रामस्थांच्या मदतीने मयत अथर्व याचा मृतदेह दफन केलेल्या खड्ड्यातून बाहेर काढून वैद्यकीय तपासणीसाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. चासनळीचे पोलीस पाटील प्रकाश शिंदे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
– गुप्तांगाला मार लागल्याने मृत्यू
मयत अथर्व याला त्याच्या आजोबाने नशेत मारहाण केली असून गुप्तांगाला मुका मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. नरबळी असल्याची अफवा आहे. मयत अथर्व याच्या शरीरात तशा कोणत्याच खूणा नाहीत. जबर मार लागल्याने मृत्यू झाला असावा. तरीही वैद्यकीय अहवाल आल्यानंतर अधिक माहिती मिळेल, अशी माहिती पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिली.
– नरबळीची घटना हीअफवाच
चासनळीमध्ये नरबळीची घटना घडल्याची अफवा असावी. तसा कोणताही प्रकार नाही. आदिवासींचे दारू पिऊन दररोज वादविवाद होतात. संबधीत आरोपीला दारू व गांजाचे व्यसन होते. नशेमध्ये मारहाण होऊन बालकाचा मृत्यू झाला असावा, अशी माहिती सरपंच नीळकंठ चांदगुडे यांनी दिली.