अमळनेर :- पोलिस भरतीसाठी तो मनात इच्छा घेऊन मुंबईत गेला. पात्र ठरण्यासाठी खूप धावलाही. मात्र, अचानक कोसळल्यावर त्याला रुग्णालयात नेले, त्या वेळी त्याला हृदयविकाराचा जोरदार झटका येऊन त्याचा मृत्यू झाला.शनिवारी (ता. २९) दुपारी घडलेल्या या घटनेतील मृत उमेदवाराचे नाव आहे अक्षय मिलिंद बिऱ्हाडे (वय २२). अक्षय हा अमळनेर येथील प्रबुद्ध कॉलनीतील रहिवासी होता.
मुंबईत बाडेगाव येथे पोलिस भरतीसाठी तो गेला होता. सुरवातीला मैदानी चाचणीसाठी पाच किलोमीटर धावावे लागणार असल्याने तो मैदानात उतरला. जिद्दीने धावू लागला. साडेचार किलोमीटर अंतर धावला. केवळ ५०० मीटर बाकी असताना अचानक तो खाली कोसळून बेशुद्ध झाला. त्याला तातडीने कळवा येथील रुग्णालयात नेण्यात आले. दोन तासांनी तो शुद्धीवरही येऊन त्याला बरेही वाटू लागले. मात्र, त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला अन् त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेने त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
आई-वडिलांचा एकुलता एक आधार हिरावून गेला. अक्षय हा अनेक वर्षांपासून पोलिस होण्याचे स्वप्न पाहून प्रचंड मेहनतही घेत होता. त्यात वडिलांच्या आजारपणामुळे या वेळी भरती होणारच, अशी जिद्द त्याची होती. मात्र, दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाल्याने स्वप्नही अपूर्ण राहिल्याने शहरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
मुंबईत विच्छेदन झाल्यानंतर अक्षय बिऱ्हाडे याचा मृतदेह रविवारी (ता. ३०) अमळनेर येथे आणण्यात येणार आहे. त्याच्या मागे आई, वडील, बहीण, काका असा परिवार आहे. मिलिंद बिऱ्हाडे यांचा तो मुलगा, तर पालिकेतील अग्निशमन विभागाचे फायरमन दिनेश बिऱ्हाडे यांचा तो पुतण्या होता.
हे पण वाचा
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.