अंजनी प्रकल्पात पाण्याची आवक सुरु.जोरदार पावसाची गरज, प्रकल्प पूर्ण भरण्याची प्रतिक्षा.

Spread the love

एरंडोल :- शहरासह ग्रामीण भागातील अनेक गावांना पाणी पुरवठा करणा-या पळासदड (ता.एरंडोल) येथील अंजनी प्रकल्पात नुकत्याच झालेल्या पावसामुळे पाण्याची आवक सुरु झाल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.प्रकल्प पूर्णपणे भरण्यासाठी जोरदार पावसाची गरज असून नागरिक जोरदार पावसाची प्रतीक्षा करीत आहेत.अंजनी प्रकल्पात शहरासह ग्रामीण भागातील कासोदा,धारागीर,जळू, नांदखुर्द,टोळी यासह अनेक गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो.धरणगाव शहरात पाण्याची समस्या निर्मा झाल्यास प्रकल्पातून अंजनी नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात येते.

अंजनी प्रकल्प परिसरात तसेच अंजनी नदीच्या उगमस्थळ परिसरात मागील आठ दिवसांपासून सर्वत्र समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे प्रकल्पात पाण्याची आवक सुरु झाली आहे.यापूर्वी पाच ते सहा वर्षांपूर्वी प्रकल्प पूर्ण क्षमतेने जलसाठा झाला होता. मागील वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे प्रकल्पात पुरेशा प्रमाणावर जलसाठा होऊ शकला नव्हता. प्रकल्पातील जलसाठा जवळपास संपुष्टात आल्यामुळे शहरासह ग्रामीण भागात पाण्याची समस्या निर्माण झाली होती.सद्यस्थितीत शहरात पाच ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.

प्रकल्पातील जलसाठा कमी झाल्यामुळे प्रकल्पातून हजारो ब्रास गाळाचा उपसा करण्यात आल्यामुळे जलसाठ्याच्या क्षमतेत मोठी वाढ होणार आहे.मागील आठ दिवसांपूर्वी प्रकल्पात असलेल्या मृत साठ्यातून शहरात पाणी पुरवठा करण्यात येत होता.मृत साठ्यातील जलसाठा दुर्गंधीयुक्त तसेच पिवळसर रंगाचा असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची समस्या निर्माण
होण्याची भीती व्यक्त केली जात होती.सद्यस्थितीत प्रकल्पात मृत जलसाठ्यात वाढ होऊन सुमारे एक टक्का जलसाठा वाढला आहे.

यावर्षी प्रकल्पातील गाळाचा मोठ्या प्रमाणावर उपसा करण्यात आला असल्यामुळे प्रत्यक्षात जलसाठ्यात प्रकल्पातील जलसाठ्यात यापेक्षा जास्त वाढ झाली आहे.पाण्याची आवक अशीच सुरु राहिल्यास जलसाठ्यात समाधानकारक वाढ होऊन नागरिकांना काही अंशी दिलासा मिळणार आहे.प्रकल्पातील जलसाठ्यामुळे परिसरातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ होत असते.प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी जोरदार पावसाची गरज असून शेतकरी जोरदार पावसाची प्रतीक्षा करीत आहेत.

प्रकल्पात पूर्ण क्षमतेने जलसाठा झाल्यास शहरासह ग्रामीण भागातील पाण्याची समस्या दूर होते असते.तसेच कालव्यांच्या माध्यमातून आणि काळ्या बंधा-यातून रब्बी पिकांसाठी आवर्तन सोडण्यात येत असल्यामुळे शेतकरी देखील प्रकल्पात पूर्ण क्षमतेने जलसाठा होण्याची प्रतीक्षा करीत
आहेत.पावसाळा सुरु होऊन पंधरा दिवस झाले असून प्रकल्पात पाण्याची आवक सुरु झाल्यामुळे आगामी काळात जोरदार पाउस झाल्यास प्रकल्पातील जलसाठा
शंभर टक्के होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार