नागपूर :- पतीसोबत झालेल्या भांडणातून साडेचार वर्षांच्या मुलासह तिने पलायल केले. नागपुरात वास्तव्यास असताना एका युवकाशी सुत जुळले. मात्र, या प्रियकराने दोघांत तिसरा नको म्हणून प्रेयसीच्या मुलाला चक्क एका ट्रेनमध्ये सोडून अपहरण झाल्याचा बनाव केला.मात्र, बिंग फुटताच गणेशपेठ पोलिसांनी मुलाला लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने सुखरुप घरी आणले असून प्रियकराला अटक केली. हंसराज ज्ञानेश्वर दखने (वय २५, रा. पोरा, लाखनी,भंडारा) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ३० वर्षीय महिलेने काही महिन्यांपूर्वी पतीशी पटत नसल्याने साडेचार वर्षांच्या मुलासह गाव सोडले. नागपुरात आल्यावर एका हॉटेलमध्ये काम करून ती एका लॉजमध्ये मुलासह वास्तव्य करू लागली. यादरम्यान तिची हॉटेलमध्ये असलेल्या हंसराजशी ओळख झाली. काही दिवसातच दोघांत प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यामुळे दोघेही एकाच लॉजमध्ये सोबत राहू लागले. तिच्याशी लग्न करायचे असल्याने त्याला मुलगा अडसर वाटू लागला.
त्यामुळे शुक्रवारी सकाळी हंसराजने मुलाला शाळेत टाकण्याच्या बहाण्याने आपल्या सोबत नेले. दुपारी तीन वाजताच्या सुमारास त्याला रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक चार वर नेऊन वर्धा मार्गाने जाणाऱ्या रेल्वेत बसविले आणि तेथून पसार झाला.घरी आल्यावर त्याने महिलेला तीन जणांनी मुलाचे अपहरण केल्याची बतावणी केली. महिलेने मुलाच्या अपहरणाची तक्रार गणेशपेठ पोलिसांकडे दाखल केली. गुन्हा दाखल करीत, पोलिस निरीक्षक पंडित यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक आष्टनकर यांच्या पथकाने तपास सुरू केला.
हंसराजला विचारणा केली असता, त्याने वेळोवेळी बदललेली साक्ष यातून पोलिसांच्या मनात संशय निर्माण झाला. त्यामुळे त्याला खडसावून विचारणा केली असता, त्याने चिमुकल्याला रेल्वेत सोडल्याची माहिती दिली. ती मिळताच, लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने वर्ध्यातून मुलाला सुखरुप घरी आणले. याप्रकरणी पोलिसांनी हंसराजला अटक केली असून तपास सुरू केला आहे.
काही बरेवाईट झाले असते तर..!
हंसराज याचे महिलेवर प्रेम होते. त्याला तिच्यासोबेत लग्नही करायचे होते. मात्र, त्याच्या या प्रेमात साडेचार वर्षीय मुलगा अडसर असल्याचे त्याला वाटत होते. त्यामुळे त्याला दूर केल्यास तिच्यासोबत त्याला वेळ घालविता येईल असा त्याचा समज झाला. त्यातून त्याने हा गुन्हा केल्याची धक्कादायक बाब समोर आली. त्याने केवळ मुलाला ट्रेनमध्ये बसवून निघून जाण्याचे कृत्य केले. मात्र, त्याच्या मनात वेगळेच काही असते तर मुलाचा जीवही धोक्यात आला असता हे विशेष.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.