Viral Video: रील बनविण्याच्या चक्कर मध्ये एका तरुणीने दोन तरुणांना घेवून गाठला मूर्खपणाचा कळस; १७ सेकंदाचा Video पाहून तुम्हालाही भरेल धडकी

Spread the love

Viral Video: एकीकडे निष्पापांना बळी जावं लागतं आणि दुसरीकडे धाडसाच्या नावाखाली मूर्खपणा करत लोक आपला जीव गमावतात. सध्या समोर येणाऱ्या घटनांची अशी एका वाक्यात मांडणी करता येईल.काही दिवसांपूर्वी तुम्ही कार चालवायचा रील बनवणारी तरुणी दरीत कोसळून मृत्यू पावली ही बातमी वाचली असेल, त्याआधी सुद्धा अनेकदा कधी पावसात समुद्रकिनारी धाडस करताना, कधी सुस्साट गाड्या चालवताना, कधी रेल्वेच्या रुळावर रील बनवताना अनेकांचा मृत्यू झालाय. पण अपघाताच्या मृत्यूच्या घटना वाढत असल्या तरी या विनाकारण शौर्य दाखवू पाहणाऱ्यांची बुद्धी काही वाढत नाहीये. असाच एक मूर्खपणा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अंदाजावरून हे पुण्यातील दरी पूल भागात केलेले शूटिंग असावे. दोन तरुण व एक तरुणी या व्हिडिओमध्ये भलतं धाडस दाखवताना दिसतायत. त्यांच्या या विचित्र व्हिडीओमुळे नेटकऱ्यांनी टीकेची झोडच घेतलीये, नेमकं असं या १७ सेकंदाच्या व्हिडीओमध्ये घडतं तरी काय, पाहूया.. @Moonfires.com अशा X अकाउंटवर हा व्हिडीओ सुरुवातीला पोस्ट करण्यात आला होता. अन्यही अनेक पेजेसवर ही क्लिप शेअर होतेय. यामध्ये रील बनवण्याच्या हट्टापायी एक तरुणी इमारतीच्या छप्परावरून लटकलेली दिसतेय. ही वास्तू पाहून तुम्हाला ठिकाण ओळखता येत असेल तर नक्की सांगा. यामध्ये एक तरुण आपल्या बाहू बळाचं प्रदर्शन करताना दुबळ्या बुद्धिबळाचा आधार घेतो आणि तिला एका हाताने पकडून ठेवतो.

बाजूला त्याचे सहकारी त्यांना नेमून दिलेल्या शूटिंगच्या कामात गुंतलेले दिसतात. ही तरुणी १७ सेकंद हवेतच एका हाताच्या आधारे तरंगत राहते, ती सुद्धा रीलसाठी फारच उत्साहाने पोज आणि हावभाव करून दाखवतेय हे तुम्हाला व्हिडीओ पाहिल्यावर लक्षात येईलच. ‘रील का चक्कर… मूर्खपणाचा कळस आहे फक्त.. सुरक्षा, काळजी ह्याबद्दल ह्यांनी कधीच वाचले नसेलच…!’ अशा कॅप्शनसह हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान, यावर कमेंट करताना काहींनी म्हटलंय की, ‘ही सगळी मुलं पाहायला लहान दिसत आहेत, यांचे आई वडील यांच्याकडे अजिबातच लक्ष देत नसतील का?’, ‘यांना अटक करून तीन महिने कोठडीत डांबून ठेवलं पाहिजे’, अशीही मागणी नेटकरी करतायत. ‘मनात भीती नसणं ही चांगली गोष्ट आहे पण म्हणून क्षुल्लक रीलसाठी एवढं धाडस करायची काय गरज आहे?

समजा चुकून हात सटकला आणि ती मुलगी खाली पडली तर तिचा जीव तर जाईलच पण बाकीचे दोघेही आयुष्यभरासाठी शिक्षा भोगत राहतील, की ती सुद्धा भीती त्यांच्या मनाला स्पर्शत नाहीच?’ असेही नेटकरी विचारत आहेत.जर हा व्हिडीओ खरोखरीच पुण्यातील असेल तर मागील काही दिवसांमध्ये पुणेकर तरुणाईच्या अशा विचित्र धाडसाचं हे तिसरं प्रकरण म्हणता येईल. काहीच दिवसांपूर्वी इन्फ्लुएन्सर माधवी हिचा बाईकवर स्टंटबाजी करतानाचा व्हिडीओ सुद्धा हडपसर पुण्यातूनच व्हायरल झाला होता. त्यापूर्वी अग्रवाल कुपुत्राच्या स्टंटबाजीने दोघांनी आपला जीव गमावला होता. हे इतकं सगळं घडत असताना तरुणाईचं प्रबोधन करणं ही खरोखरच काळाची गरज ठरतेय असं तुम्हाला वाटतं का?, हे कमेंट करून नक्की सांगा, तसेच त्यासाठी नेमके काय उपाय करायला हवेत हे सुद्धा नक्की कळवा.

हे पण वाचा

टीम झुंजार