पुणे : हनीट्रॅपमध्ये अडकवून एका जेष्ठाला लुटणाऱ्या टोळीत पुणे पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक सामील झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यात संबंधित उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र गुन्हा दाखल होताच उपनिरीक्षक पसार झाला आहे.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक काशीनाथ मारुती उभे ( वय ५५ ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हनीट्रॅपमध्ये अडकवून ज्येष्ठाला लुटल्याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अवंतिका सचिन सोनवणे ( वय- ३५ ), पूनम संजय पाटील ( वय- ४० ), आरती संजय गायकवाड ( वय- ५८, तिघी रा. कोथरुड ) यांना अटक करण्यात आली. पूनम पाटील विरुद्ध काेल्हापूर येथील शाहूपुरी पोलीस ठाण्यातही एका डाॅक्टरला ५० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.या टोळीने अनेकांना हनीट्रॅपमध्ये ( मोहजालात ) अडकवून लुटल्याचा संशय आहे. त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. कोथरूड भागातील एका जेष्ठाला मोहजालात अडकवून महिलेने एका हॉटेलमध्ये नेले.
त्यानंतर पोलीस आणि महिला हक्क आयोगाचे सदस्य असल्याचे सांगून जेष्ठाला मारहाण करण्यात आली. बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. त्याच्याकडील २० हजारांची रोकड मोबाईल संच काढून घेण्यात आला. २९ जुलै रोजी लक्ष्मी रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली होती. याप्रकरणी तीन महिलांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे यांनी सुरु केला.
लक्ष्मी रस्त्यावरील हाॅटेलमध्ये महिलेने आधार कार्ड दिले होते.पोलिसांनी तपास करून अवंतिका सोनवणेसह, पूनम पाटील, आरती गायकवाड यांना ताब्यात घेतले.सीसीटीव्ही चित्रीकरणात एक मोटार आढळून आली. तेव्हा मोटार मुळशीतील एकाच्या नावावर असल्याचे समजले.चौकशीत मोटारीचा वापर पोलीस उपनिरीक्षक काशीनाथ उभे करत असल्याचे उघड झाले.उभे या कटात सामील असल्याचे उघडकीस आले आहे.हाॅटेल मधील खोलीत महिला हक्क आयोगाचा सदस्य असल्याचे सांगून प्रवेश करणाऱ्या महिलांसोबत उभे असल्याची माहिती तपासात मिळाली आहे.
हे पण वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






