पुन्हा अवकाळीचे सावट; राज्यात पुढील दोन दिवस महत्त्वाचे, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

Spread the love

मुंबईः राज्यात एकीकडे उन्हाचा चटका वाढला असता त्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे वातावरण निर्माण झाले. खान्देश, नाशिकसह कोकण आणि राज्यातील काही जिल्ह्यात विजेच्या कडाकडाटासह किरकोळ पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुढील दोन दिवसांमध्ये मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटही होऊ शकतो. या काळात कोकणातील आंब्यावर परिणाम होण्याची भीती आहे. उत्तर कोकणामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली नसली तरी सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने मुंबई आणि परिसरामध्ये अधिक उकाडा जाणवत आहे.

मराठवाड्यापासून तमिळनाडूच्या अंतर्भागापर्यंत ढगांची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात अवकाळी पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज, मंगळवारी आणि उद्या, बुधवारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे गडगडाट, जोरदार वारे आणि विजांचा कडकडाट तुरळक ठिकाणी होऊ शकेल. गुरुवारी या परिसरात हलक्या सरींची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा येथेही बुधवारपर्यंत तर सोलापूर, सांगली, अकोला, बुलडाणा, चंद्रपूर, यवतमाळ येथेही आज, मंगळवारी तुरळक ठिकाणी गडगडाटाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

टीम झुंजार