फेस बुकवर झाली ओळख मग मैत्री,त्याचे रूपांतर प्रेमात,किराणा दुकानदाराशी लग्न करण्यासाठी सातसमुद्रापार करून मेरी आली भारतात.

Spread the love

बुंदी (राजस्थान) :- प्रेमासाठी लोक वाटेल ते करतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. फिलिपाइन्सला राहणारी मेरी सातासमुद्रापार तिचं प्रेम शोधण्यासाठी राजस्थानच्या बुंदी येथे पोहोचली आहे. ही महिला गावातील तरुणाशी लग्न करण्यासाठी आली आहे, सध्या तिचे डॉक्युमेंट्स हे चेक केले जात आहेत.त्यानंतर परवानगी मिळताच ती लग्न करणार आहे.

फेसबुकवर सुरू झाली लव्हस्टोरी

फिलिपाइन्समधील मेरी आणि बुंदी येथील एका तरुणाची लव्हस्टोरी खूप चर्चेत आहे. बुंदी शहरातील शिव कॉलनीत किराणा दुकान चालवणाऱ्या मुकेश शर्माच्या प्रेमासाठी मेरी सर्व काही सोडून भारतात आली आणि नंतर ती राजस्थानच्या बुंदी येथे पोहोचली. मुकेश आणि मेरीची लव्हस्टोरी फेसबुकवरून सुरू झाली. बुंदीच्या शिव कॉलनीत किराणा दुकान चालवणाऱ्या मुकेश शर्माची १४ वर्षांपूर्वी फिलिपाइन्समध्ये राहणाऱ्या मेरीशी फेसबुकवर ओळख झाली आणि त्यांच्यात मैत्रीनंतर प्रेम फुललं. दोघंही रोज बोलू लागले. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याने मेरी राजस्थानमध्ये आली.

मुकेशच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण

मेरी आपल्या घरी आलेली पाहून मुकेशला खूप आनंद झाला. परदेशी महिला सून होणार असल्याने मुकेशच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण असून त्याच्या घरी अभिनंदनासाठी गर्दी होत आहे. तसेच मेरीला पाहण्यासाठी लोक घरी येत आहेत. मेरी येताच कॉलनीतील लोकांनी आपल्या भावी सुनेच्या स्वागताची पूर्ण तयारी केली आणि मोठ्या उत्साहात तिचे स्वागत केले.

कॉलनीतील लोक ढोल-ताशाच्या तालावर खूप नाचले. महिलांनी गाणी गायली आणि परिसरातील लोक आनंदाने उत्तेजित झालेले पाहून मेरीलाही नाचण्याचा मोह आवरला नाही. मेरी आणि मुकेश या दोघांनी सदर पोलीस ठाणे गाठून आवश्यक डॉक्युमेंट जमा केली. या प्रकरणी अतिरिक्त पोलीस अधीक्षक उमा शर्मा सांगतात की, आम्हालाही या प्रकरणाची माहिती मिळाली. त्यानंतर आता महिलेचा पासपोर्ट आणि व्हिसा तपासला जात असून जी काही कायदेशीर कारवाई आवश्यक असेल ती पूर्ण केली जाईल.

हे पण वाचा

टीम झुंजार