मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर टाटा आपीएल २०२२ चा तेरावा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू जिंकला. हर्षल पटेलने उत्तुंग षटकार मारून अशक्य वाटणारं आव्हान लिलया पार केले. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. राजस्थान रॉयल्सकडून खेळाची सुरूवात करायला जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल उतरले. डेव्हिड विलीने दुसर्याच षटकातच जयस्वालचा त्रिफाळा उध्वस्त केला. केन विल्यमसनने त्याचा झेल टिपला. त्याच्या जागी आलेल्या जोस बटलर आणि देवदत्त पडीक्कल यांनी चांगला ताळमेळ साधला. सामन्याचं १०वं षटक आणि हर्षल पटेलच्या वैयक्तिक पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर विराट कोहलीने हवेत उडालेला झेलं सर्व कौशल्य पणाला लावून टिपला. राजस्थान ७६/२ अशा अवस्थेत पोहचला. बटलरच्या साथीला कर्णधार संजू सॅमसन आला. पण स्थिरस्थावर होण्याआधीच वाणींदू हसरंगाने त्याचा स्वतःच्या गोलंदाजीवर झेल टिपला. राजस्थान ८६/३ अशा अवस्थेत असताना शिमरॉन हेटमेअर मैदानात उतरला. त्याने आणि बटलरने डावाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत फलंदाजी केली. त्यांनी ५६ चेंडूंत संघाच्या खात्यावर महत्त्वपूर्ण ९२ धावा जोडल्या. गोलंदांजांना चांगलं वातावरण देण्याचा प्रयत्न केला. बटलरने ६ षटकारांच्या सहाय्याने ४७ चेंडूंत बिनबाद ७० धावा काढल्या. तर हेटमेअरने ४ चौकार आणि २ षटकार यांच्या सहाय्याने ३१ चेंडूंत बिनबाद ४२ धावा काढल्या. राजस्थान १६९/३ तंबूत परतले.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळाची सुरूवात करायला कर्णधार फाफ ड्यू प्लेसिस आणि अनुज रावत उतरले. दोघांनी संघासाठी झटपट ५० धावांची भागीदारी केली. ७ षटकाच्या शेवटच्या चेंडूवर फाफ ड्यू प्लेसिसला यझुवेंद्र चहलला वैयक्तिक २९ धावांवर बाद केले. पुढच्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अनुज रावतला संजू सॅमसनकडे वैयक्तिक २६ धावांवर बाद केले. संजू सॅमसनने विराट कोहलीला पुढच्याच षटकात धावबाद केले. यझुवेंद्र चहलने पुढच्याच चेंडूवर डेव्हिड विलीचा त्रिफाळा उध्वस्त केला. ट्रेण्ट बोल्टने रुदरफोर्डला नवदीप सैनीकडे झेल देण्यास भाग पाडले. बंगळुरू ८७/५ अशा अवस्थेत पोहचला आणि राजस्थानचं पारडं आता जड वाटू लागलं. पण शमशाद अहमद आणि दिनेश कार्तिकच्या मनात वेगळचं चित्रं होतं. आणि ते त्यांनी क्रिकेटच्या मैदानाच्या कॅनव्हासवर मनाजोगतं रंगवलं. प्रेक्षक आणि तज्ज्ञांकडे त्यांच्या कौतुकास शब्दच कमी पडत होते. ट्रेण्ट बोल्टने शमशाद अहमदचा त्रिफाळा उध्वस्त केला. शेवटच्या १३ चेंडूंत बंगळुरूला १६ धावांची गरज होती. दिनेश कार्तिकने आपल्या हातात खेळाची सूत्रं घेतली. १९व्या षटकात त्याने दोन चौकारांच्या सहाय्याने १२ धावा काढल्या. शेवटच्या षटकात केवळ चार धावांची गरज असताना हर्षल पटेलने पहिल्या चेंडूवर षटकार मारून विजयश्री खेचून आणली. आणि पुन्हा बंगळुरू संघ विजयी मार्गावर परतला. दिनेश कार्तिकला सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार देण्यात आला. त्याने ४४ धावांचं बहुमूल्य योगदान दिलं.
उद्या कोलकत्ता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडिअन्स यांच्यात पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर रंगणार आहे. मुंबई आतापर्यंत झालेले दोन सामने गमावून बसला आहे, तर कोलकाता दोन सामने जिंकून दुसर्या स्थानी आहे. रोहित आणि टीमसाठी हा सामना खूपच महत्वाचा ठरणार आहे.