मिरज : मालगाव (ता. मिरज) येथील खासगी क्लासचालक सुधाकर सावंत यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांची सहकारी शिक्षिका नम्रता सदाफुले व तिचा चुलत मामा नंदकुमार कदम (रा. मालगाव) या दोघांना शुक्रवारी अटक करण्यात आली.पैशासाठी या दाेघांनी सुधाकर सावंत यांना मारहाण करीत माेबाईलमध्ये चित्रीकरण करून धमकावल्यानेच सावंत यांनी आत्महत्या केल्याची तक्रार आहे.गेल्या ३० वर्षांपासून मालगाव येथे कोचिंग क्लासेस घेणारे सुधाकर सावंत यांनी शुक्रवार रोजी घराशेजारील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली हाेती.
त्यांच्या क्लासमध्ये सहकारी शिक्षिका म्हणून नम्रता नारायण सदाफुले यांची ६० टक्के आर्थिक भागीदारी होती. मृत्युपूर्वी सुधाकर यांनी नम्रता सदाफुले व नंदकुमार कदम हे आपल्याला मानसिक त्रास देत असल्याचे तसेच कदम हा फोनवरून शिवीगाळ करीत दमदाटी करत असल्याचे पत्नीला सांगितले होते. सुधाकर सावंत यांच्या आत्महत्येच्या आठवडाभरापूर्वी नम्रता सदाफुले व नंदकुमार कदम यांनी क्लासमध्ये येऊन सुधाकर सावंत यांना बेदम मारहाण केली. यानंतर सावंत यांच्या खात्यावरून १० हजार रुपये नम्रता सदाफुले यांनी जबरदस्तीने आपल्या खात्यावर घेतले होते.
मृत्यूनंतर सावंत यांच्या मोबाईलमध्ये कदम याच्यासोबतचे संभाषण कुटुंबीयांना आढळले. या संभाषणात नम्रता सावंत यांना मारहाण करुन व्हिडीओ केल्याचा तसेच नम्रता हिने आपले क्लासचे मानधन पाच वर्षांसाठी शंभर टक्के वाढवून घेतल्याचे समजले.याबाबत सावंत यांच्या पत्नी आशाराणी सावंत यांनी नम्रता सदाफुले व तिचा चुलत मामा नंदकुमार कदम यांच्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून सुधाकर सावंत यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार ग्रामीण पोलिसात दिली आहे. सावंत यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी नम्रता सदाफुले व नंदकुमार कदम यांना अटक केली आहे. न्यायालयाने दोघांना तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.
बदनाम करण्याची धमकी
मारहाणीचे चित्रीकरण करत काही चुकीच्या गोष्टी त्यांच्याकडून वदवून घेतल्या होत्या. ‘तुला बदनाम करतो, तुझा क्लास संपवतो, माझे मानधन वाढवून दिले नाहीस तर तुला सोडणार नाही’ अशा धमक्या देत सदाफुले व कदम यांनी सावंत यांचे चित्रीकरण केले.
हे पण वाचा
- Viral Video:सोशल मीडियावर रील बनवायच्या नादात महिलेच्या साडीला लागली आग;अन् पुढे जे झाले ते भयानकच पहा व्हिडिओ
- एक सेलिब्रिटी ज्याचे इन्स्टाग्रामवर 56 लाख फॉलोअर पण त्यास 200 जणांनीही मत दिलं नाही! त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा.
- वारंवार होत असलेल्या भांडणामुळे पतीने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात दगड घालून केली हत्या, स्वतःहून पोलिस ठाण्यात झाला हजर.
- यावल तालुक्यात शेत शिवारात कापूस वेचणी करतांना सर्पदंश झालेल्या ३० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू.
- आजचे राशी भविष्य रविवार दि. २४ नोहेंबर २०२४