ट्रक मोटर सायकलच्या अपघातात पती पत्नी ठार एरंडोल येथील घटना.

Spread the love

एरंडोल :- भरधाव वेगाने जाणा-या ट्रकने मोटर सायकलला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात मोटर सायकलवरील पती व पत्नी जागीच ठार झाले हा अपघात आज सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील न्यू इंग्लिश मेडियम स्कूल जवळ झाला.याबाबत माहिती अशी की चाळीसगाव येथील शिक्षक अविनाश विजयसिंग पाटील (वय५५)हे पत्नी मीनाबाई अविनाश पाटील (वय ४८) यांचेसह पिंपळकोठा (ता.एरंडोल) येथे मोटार सायकल क्रमांक एम एच १९ ई ई ४७१७ ने नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी आले होते.

अंत्यविधी झाल्यानंतर अविनाश पाटील हे पत्नीसह चाळीसगाव येथे जात असतांना सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास न्यू इंग्लिश स्कूल जवळ समोरून येणा-या सायकलस्वारास वाचवण्याचा प्रयत्न करीत असतांना अचानक जळगावकडून धुळ्याकडे जात असलेल्या ट्रक क्रमांक एम एच १८ बीजी १०६६ ने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्यामुळे अविनाश पाटील यांचेसह त्यांच्या पत्नी जागीच ठार झाले. पिंपळकोठा येथून अंत्यविधी आटोपून घराकडे जात असतांना केवळ सहा किलोमीटर अंतरावर अपघात झाला.

केवळ अर्ध्या तासापूर्वी सर्व नातेवाईकांना भेटून घराकडे जात असलेल्या अविनाश पाटील यांचा पत्नीसह अपघातात मृत्यू झाल्याची माहिती मिळताच परिवारातील सदस्यांना मोठा धक्का बसून सर्व कुटुंब शोकसागरात बुडाले.मयत अविनाश पाटील हे निमगाव (ता.यावल) येथील मूळ रहिवासी असून नौकरीनिमित्त ते
चाळीसगाव येथे राहत होत्या.त्यांच्या पत्नी मीनाबाई पाटील ह्या चाळीसगाव येथे पाळणाघर चालवत होत्या.त्यांच्या पच्छात दोन मुळे असून त्यांच्यावर
उद्या (ता.१७) दुपारी बारा वाजता चाळीसगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांचेसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले.अविनाश पाटील व त्यांच्या पत्नी मीनाबाई पाटील यांना ग्रामीण रुग्णालयात आणले असता ते मयत झाल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी सांगितले.अपघाताची माहिती मिळताच मयत अविनाश पाटील यांच्या नातेवाईकांनी अपघातस्थळी व रुग्णालयात गर्दी केली.याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलीसस्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते.पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शरद बागल व त्यांचे सहकारी तपास करीत आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार