.
मुंबई : मार्च महिन्यापासूनच राज्यात तापमानाचा पारा कमालीचा वाढला आहे. अद्यापही उन्हाचा पारा वाढताच आहे. राज्यात उष्णाघातामुळे आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. कडाक्याच्या उन्हामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्याच दरम्यान राज्यातील काही भागांत अवकाळी पाऊस पडत आहे तर काही भागांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या सहा जिल्ह्यांचा समावेश आहे.
तर राज्यातील काही भागांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामध्ये बुलढाणा, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांचा समावेश आहे. तसेच 7 एप्रिल रोजी सुद्धा बुलढाणा, अकोला आणि अमरावतीत उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे
पुढील हवामानाचा अंदाज आणि इशारा
6 एप्रिल
मध्य महाराष्ट्र – तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वीजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
मराठवाडा – हवामान कोरडे राहण्याची शक्यता
विदर्भ – विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.