नांदेड : एकीकडे भारतीय स्वातंत्र्याचा उत्सव सर्वत्र सुरू असताना मात्र जिल्ह्यातील अनेक वाड्या, तांडे विकासापासून कोसो दूर आहेत. लोहा तालुक्यातील थावरा तांडा या गावात गुरुवारी (ता.१५) पक्का रस्ता नसल्याने वऱ्हाडींना चिखल तुडवीत विवाहस्थळ गाठावे लागले.सकाळी साडेअकराचा मुहूर्त खराब रस्त्यामुळे चुकला आणि दुपारी सव्वातीन वाजता वधूवरांवर अक्षता पडल्या. मात्र यासाठी वधू-वरांना कडेवर घेऊन थावरा तांडा गाठावे लागले.माळाकोळीपासून दहा किलोमीटर अंतरावरील चोंडी ग्रामपंचायत अंतर्गत थावरा तांडा येतो. या तांड्यावरील सातशे लोकसंख्या असून मूलभूत सुविधांपासून हे नागरिक वंचित आहेत.
प्यायला पाणी नाही. दळणवळणाची कुठली साधने नाहीत.चार किलोमीटरचा रस्ता हा पांदण रस्ता आहे. तो अरुंद असल्याने साधी बैलगाडीही जाऊ शकत नाही. सुमारे २४ लाख रुपये खर्चून केवळ एक किलोमीटरचा रस्ता अर्धवट करण्यात आला.स्वातंत्र्यदिनी थावरा तांडा येथील वामन शिवराम राठोड यांची कन्या काजल हिचा विवाह राळगा तांडा (ता. अहमदपूर) येथील करण संजय पवार यांच्याशी झाला. अहमदपूरची वऱ्हाडी मंडळी चोंडी गावाजवळ वाहनातून उतरली. पण चिखलाच्या रस्त्याने साधी बैलगाडीही जात नसल्यामुळे वऱ्हाडी चिखल तुडवतच गावात पोचले.
वधू-वरांना तर कडेवर घेऊन थावरा तांडा आणावे लागले. या सगळ्या सोपस्करात चार तास लागले. त्यानंतर विवाहसोहळा साजरा झाला.महसूल प्रशासनाला अनेकवेळा लेखी निवेदन देऊनही येथील रस्त्याचा प्रश्न सुटलेला नाही. रस्ता रुंद करण्यासाठी येथील नागरिकांची सहमती असून केवळ एक शेतकरी रस्त्याचे रुंदीकरण करू देत नसल्याचे तक्रार महसूल विभागाकडून सांगण्यात आले.
तांड्यावर मोठ्या प्रमाणावर जल प्रदूषण आहे. कीटक, डासांचे प्रमाण अधिक आहे. साथीचे रोग बळावत आहेत. दळणवळणाची साधने नसल्यामुळे रुग्णालयात लवकर जाता येत नाही. पावसाळ्यात अंत्ययात्रा काढणे जिकरीचे आहे, अशी माहिती येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष राठोड यांनी दिली. माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार श्यामसुंदर शिंदे यांना अनेक वेळा भेटून समस्या सांगितल्या मात्र काही परिणाम झाला नाही.
चोंडी ग्रामपंचायत अंतर्गत थावरा तांडा येतो. मात्र मूलभूत सुविधा मिळत नाहीत. आमच्या तांड्याला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा दिल्यास विशेष योजना नागरिकांपर्यंत पोहोचतील.
-गणेश राठोड,उपसरपंच, थावरा तांडा
गावाला जाण्यास रस्ता नसल्याने नवरदेव आणि वऱ्हाड चिखल तुडवत गावात उशिरा पोचले. लग्नाला चार तास उशीर झाला. वरात चिखलमय रस्त्यातून काढली. प्रशासनाने पक्का रस्ता करावा.
– अविनाश पवार, तालुकाध्यक्ष,बंजारा क्रांती दल
- आजचे राशी भविष्य रविवार दि. २४ नोहेंबर २०२४
- जळगाव ग्रामीण मतदार संघातून शिवसेना महायुतीचे गुलाबराव पाटील यांच्या दणदणीत विजय.
- एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा एकतर्फी विजय,५६ हजार ३३२ मतांनी दणदणीत विजय.
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन