CCTV Video:भावांना राखी बांधली अन् बहिणीने सोडले प्राण;एकतर्फी प्रेमाच्या जाचाला कंटाळलेल्या अल्पवयीन मुलीची हृदयद्रावक कहाणी.

Spread the love

CCTV Video: देशभर भाऊ-बहिणीच्या नात्यातील गोड सण साजरा करत आहेत. देशभरातली बहिणी त्यांच्या भावांकडून त्यांच्या सुरक्षेचं आश्वासन घेत आहेत. परंतु, तेलंगणातल महबूबाबाद येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडलीय. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मुलीने शेवटची इच्छा म्हणून आपल्या भावांना राखी बांधण्याची इच्छा व्यक्त केली. तिने राखी बांधलीही आणि काहीच वेळात तिचा मृत्यू झाला. तेलुगुच्या एका स्थानिक वृत्ता हवाला देत फ्रि प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

हैदराबादपासून २०० किमी लांब असलेल्या महबूबाबाद जिल्ह्यात नरसिमुलापेट मंडळातील आदिसावी वस्तीत राहणारी अल्पवयीन मुलगी कोडाड येथील एका खाजगी महाविद्यालयात पॉलिटेक्निकच्या द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी होती. प्रेमाच्या नावाखाली एक तरुण तिचा छळ करत होता. सततचा छळ सहन न झाल्याने मुलीने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. दोन दिवसांपूर्वी तिने आत्महत्येचा प्रयत्न करत कीटकनाशक प्राशन केले. त्यानंतर नातेवाइकांनी तिला उपचारासाठी महबूबाबाद एरिया हॉस्पिटलमध्ये दाखल केले. आज सकाळपर्यंत मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू होते.

उपचार सुरू असले तरी आपला मृत्यू अटळ आहे हे या अल्पवयीन मुलीला कळून चुकलं होतं. त्यामुळे तिने आपल्या भावांना शेवटची राखी बांधण्याची इच्छा व्यक्त केली. तिला राखी बांधण्यासाठी काल रात्री तिच्या भावांना रुग्णालयात बोलावण्यात आले. तिने आपल्या भावांना प्रेमाने जवळ घेत कपाळावर चुंबन दिले. प्रेम, आपुलकीने तिने त्यांच्याविषय़ी काळजी व्यक्त केली. त्यानंतर तिने आपल्या भावांच्या हाताला राखी बांधली. राखी बांधताना हा क्षण कॅमेऱ्यातही कैद करण्यात आला.

आई-बाबांची काळजी घे, भावांकडून घेतलं वचन

राखी बांधल्यानंतर तिने आपल्या पालकांबाबत एक वचन घेतलं. पालकांची योग्यरित्या काळजी घेण्याचं वचन तिने भावांकडून घेतलं. या भावनिक क्षणानंतर काही वेळातच तिचे निधन झाले.तिच्या मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. नरसिमुलापेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीवर कारवाई करण्यासह या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार