.

नवी दिल्ली – भाजप नेहमी “राष्ट्र भक्ती’ करतो. तर विरोधक “परिवार भक्ती’ करतात. घराणेशाही जपणारे राजकीय पक्ष लोकशाहीचे सर्वात मोठे शत्रू आहेत, हे आता लोकांच्या हळूहळू ध्यानात येऊ लागले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. भाजपच्या 42 व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने भाजपच्या कार्यकर्त्यांशी ते संवाद साधत होते.
घराणेशाही जपणारे राजकीय पक्ष आपल्या कुटुंबाचीच सत्ता कायम कशी राहिल, याकडे लक्ष देत असतात. लोकशाहीच्या निकषांकडे त्यांचे फार कमी कक्ष असते. जरी वेगळ्या राज्यात कार्यरत असले तरी एकमेकांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे झाकण्याचा प्रयत्न ते करत असतात, असे मोदी म्हणाले.
जेंव्हा संपूर्ण जग दोन विरुद्ध गटांमध्ये विभागले गेले तेंव्हा भारताने देशहिताला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे, असे रशिया-युक्रेनच्या अनुषंगाने बोलताना मोदी म्हणाले. राष्ट्रीय किंवा राज्या पातळीवर घराणेशाहीचे पक्ष सत्तेवर येतात, तेंव्हा त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य स्थानिक पातळीवर राष्ट्रीय दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. भाजपने याला विरोध केला आणि घरामेशाहीला विरोध हा निवडणुकीचा मुद्दा बनवला, असे मोदी म्हणाले.
घराणेशाहीच्या पक्षांनी केलेल्या अन्यायाला भाजपचे कार्यकर्ते विरोध करत आहेत. काहींनी तर आपले जीव देखील गमावला आहे. पण या लोकसाहीविरोधी शक्तींचा पराभव होईपर्यंत हा लढा सुरू राहिल, असे पश्चिम बंगाल आणि केरळच्या संदर्भाने ते म्हणाले.
अवमूल्यन आणि भ्रष्टाचार हे मतांच्या राजकारणाचे साईड इफेक्ट आहेत. मात्र आता कल्याणकारी योजनांचे लाभ प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारी यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. सामाजिक न्यायासाठी हे सर्वात मोठे माध्यम आहे, असेही पंतप्रधानांनी सांगितले.