धक्कादायक ! घरातून निघून गेलेल्या २५ वर्षीय महिलेच्या मृतदेह आढळला पाण्याच्या टँकरमध्ये खून की आत्महत्या ?

Spread the love

पुणे :- येथून एक धक्कादायक बातमी समोर येत नाही. पाण्याच्या टँकर मधून पाणी येत नसल्याने टँकरचे झाकण उघडून बघितल्यानंतर टँकर मध्ये चक्क महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. ही घटना पुण्यातील हांडेवाडी परिसरामध्ये घडली.याच भागात राहणाऱ्या कौशल्या मुकेश चव्हाण (वय २५, रा. दुगड चाळ, जेएसपीएम कॉलेज जवळ, हांडेवाडी) या महिलेचा हा मृतदेह आहे. ही महिला घरातून निघून गेली होती. त्यानंतर तिचा थेट मृतदेह आढळून आला आहे.

याबाबत कोंढवा पोलीस ठाण्याकडून तपास सुरू करण्यात आला आहे.पुरुषोत्तम नरेंद्र ससाणे (वय २७, रा. दुगड चाळ, हांडेवाडी) यांचा पाण्याचा टँकरचा व्यवसाय आहे. बुधवारी दिवसभर विविध भागांमध्ये पाणी पोहोचवल्यानंतर संध्याकाळी ससाणे यांनी टँकर आपल्या घराजवळ पार्क केला होता. त्यानंतर ते आपल्या घरी गेले. गुरुवारी सकाळी पुन्हा नेहमीप्रमाणे त्यांनी टँकर पाणी भरण्यासाठी बाहेर काढला. रामटेकडी येथे त्यात पाणी भरले व टँकर घेऊन ते फुरसूंगी परिसरातील पॉवर हाऊसजवळ असलेल्या एका ठिकाणी पाणी पोचवण्याकरिता गेले.

मात्र तिथे पोहोचल्यानंतर पाण्याच्या टाकीत पाणी सोडत असताना पाणी बाहेर येत नव्हते. त्यामुळे पाण्याच्या पाईप मध्ये काही बिघाड झाला असेल असे त्यांना वाटले. त्यामुळे त्यांनी सुरुवातील पाण्याचा पाईप तपासला त्यात काहीच आढळून आले नाही म्हणून वॉल्व्ह तपासला. सगळे काही दुरुस्त असूनही पाणी येत नसल्याने त्यांनी पाईप काढून पाहिले असता साडीचे कापड आढळून आले. साडी टँकर मध्ये कशी आली हे पाहण्यासाठी त्यांनी टँकरचे झाकण उघडले असता त्यांना महिलेचा मृतदेह आढळून आला.

त्यानंतर त्यांनी तात्काळ कोंढवा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. थोड्याच वेळात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे.दरम्यान, या महिलेचा मृतदेह टँकरमध्ये आढळून आल्याने हांडेवाडी परिसरात एकच खळबळ उडाली. ही महिला नेमकी घरातून का निघून गेली होती ? तिने स्वतः या टँकरमध्ये आत्महत्या केली की खून करून हा मृतदेह टँकरमध्ये टाकण्यात आला, याचा तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी सांगितले.

हे पण वाचा

टीम झुंजार