मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : कोलकत्ता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडिअन्स यांच्यात पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर टाटा आपीएल २०२२ चा चौदावा सामना कोलकत्त्याने ५ गडी आणि २४ चेंडू राखून जिंकला. कोलकत्ता नाईट रायडर्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. मुंबई इंडिअन्सकडून खेळाची सुरूवात करायला कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन उतरले. उमेश यादवने तिसर्याच षटकातच रोहितला बाद केले. रोहित आणि झहीर खानमध्ये असलेले मतभेद रोहितच्या कामगिरीवर परिणाम करत आहेत. डीवाल्ड ब्रीविस आणि ईशानने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण ८व्या षटकात वरुण चक्रवर्तीने ब्रीविसला बाद केले. ब्रीविसने प्रत्येकी २ चौकार आणि षटकारांच्या सहाय्याने २९ धावा काढल्या. त्याच्या जागी आलेल्या सूर्यकुमार यादव आणि ईशानने डावाला छान आकार देण्यास सुरूवात केली. पण मुंबई इंडिअन्सचा संघ ठरावीक अंतराने बळी गमावत होते. ११व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूंवर पॅट कमिन्सने ईशानला केवळ १४ धावांवर बाद केले. मुंबईची अवस्था ५५/३ अशी दयनीय झाली. यादव आणि तिलक वर्मा यांनी चांगला ताळमेळ साधला. केवळ ३४ चेंडूंमध्ये यादवने आंद्रे रसेला चौकार मारून सनसनाटी अर्धशतक झळकावले. २०व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर पॅट कमिन्सने यादवला बाद केले. किरॉन पोलार्डने आल्या आल्या कमिन्सची लय बिघडवली. षटकाच्या दुसर्या चेंडूवर दोन धावा, नंतर जबरदस्त षटकार, पुढचा चेंडू पंचांनी स्वेर घोषित केला. त्यानंतर पुन्हा दोन धावा, आणि शेवटच्या दोन्ही चेंडूंवर अफलातून असे षटकार लगावले. पोलार्डने केवळ ५ चेंडूंत ३ षटकारांच्या सहाय्याने २२ धावा काढल्या. आणि संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. मुंबई इंडिअन्स १६१/४ असे स्थिरावले. पॅट कमिन्सच्या शेवटच्या षटकाने त्याचं गोलंदाजी पृथक्करण पूर्णपणे बिघडवलं. सूर्यकुमार यादवने योग्यवेळ साधून स्वतःची खेळी संपवली त्यामुळेच पोलार्डने संघाने ठरवलेल्या रणनीती प्रमाणे फलंदाजी केली आणि त्याचे परिणाम दिसून आले.
कोलकत्ता नाईट रायडर्सकडून खेळाची सुरूवात करायला अजिंक्य रहाणे आणि व्यंकटेश अय्यर उतरले. मुंबई कडून बासील थंम्पी याने गोलंदाजीला सुरूवात केली. पहिल्या षटकाच्या अखेरीस कोलकत्याने केवळ ३ धावा जमा केल्या. रहाणेला ५व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर केवळ ७ धावांवर टायमल मिल्सने बाद केले. कर्णधार श्रेयस अय्यरला केवळ १० धावांवर डॅनियल सॅम्सने बाद केले. व्यंकटेश अय्यर आणि सॅम बिलिंग्स यांनी हळूहळू धावसंख्या वाढवण्यासाठी सुरूवात केली. थंम्पीने ९व्या षटकात केवळ ७ धावा दिल्या. त्यात १ षटकार सॅम बिलिंग्सने मारला होता. पुढच्याच षटकात सॅम बिलिंग्सला मुरुगुन अश्विनीने बाद केले. त्याने १७ धावा काढल्या. १० षटकात कोलकत्ता ६७/३ अशा अवस्थेत पोहचला. १२व्या षटकात नितीश राणाला मुरुगुन अश्विनीने तंबूमध्ये पाठवले. शेवटच्या ७ षटकांमध्ये कोलकत्याला ६१ धावांची गरज होती. आणि १४व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूंवर टायमल मिल्सने आंद्रे रसेलला ११ धावांवर बाद केले. व्यंकटेश अय्यरने ४१ चेंडूंत अर्धशतक झळकावले. अजूनदेखील मुंबईच्या हातात सामना होता. पण पॅट कमिन्स नावाचा झंझावात मैदानात धुमाकूळ घालू लागला. त्याने ४ चौकार आणि ६ षटकारांच्या सहाय्याने केवळ १५ चेंडूंत बिनबाद ५६ धावा काढल्या. केवळ १४ चेंडूंत त्याने ५० धावा काढल्या आणि विजयाच्या षटकाराने आनंद द्विगुणित केला. मुंबईचे गोलंदाज आपल्या योग्यतेनुसार गोलंदाजी करू शकले नाहीत. त्यामुळेच मुंबईच्या पदरात हा मानहानिकारक पराभव पडला. मुंबई संघ व्यवस्थापनाने आता महत्वाची भूमिका घेण्याची गरज आहे. काही खेळाडूंना सक्तीची विश्रांती देण्याची गरज आहे.
पॅट कमिन्सला सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार देण्यात आला. त्याने प्रथम गोलंदाजी करताना ४९ धावांमध्ये २ गडी बाद केले आणि विजयाचा शिल्पकार ठरताना १५ चेंडूंत ५६ धावा काढल्या. त्याच्या ह्या अष्टपैलू कामगिरीचा यथार्थ गौरव करण्यात आला.
उद्या लखनौ सुपर जायंटस आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगणार आहे. दिल्लीला विजयाची गरज आहे तर लखनौ विजयी रथ पुढे नेण्यास उत्सुक आहे.