एकतर्फी प्रेमातून वारंवार त्रास देणाऱ्या तरूणाच्या जाचाला कंटाळून विद्यार्थींनीने विहिरीत उडी घेऊन संपविली जीवनयात्रा.

Spread the love

माझ्याशी प्रेम कर अशी बळजबरी करत होता तरूण त्यास चार वेळा दिली होती समज.

छत्रपती संभाजीनगर : एकतर्फी प्रेमातून वारंवार त्रास देणाऱ्या तरूणाच्या जाचाला कंटाळून विद्यार्थींनीने विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना रविवारी दुपारी १ च्या सुमारास ओव्हर गावात घडली.पूजा शिवराज पवार (१६, रा. ओहर) असे या विद्यार्थींनीचे नाव आहे. संतप्त नातेवाइकांनी घाटीत कारवाईची मागणी करीत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे काहीवेळ तणावसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, हर्सूल ठाण्यासमोरही जमाव एकत्र आला होता. याबाबत अधिक माहिती अशी, पूजा ही युवती अकरावी विज्ञान शाखेत शिकत होती. खासगी शिकवणीसाठी ती शहरातच राहत होती. सलग सुट्या म्हणून ती दोन दिवसांपूर्वी गावी गेली होती.

दरम्यान, मागील आठ महिन्यांपासून संशयित आरोपी तरुण कासीम पठाण हा तिला प्रेम कर, म्हणत बळजबरी करीत होता. ती गावी आल्याची संधी साधून त्याने पुन्हा तिला त्रास दिला. त्यामुळे तणावातून पूजाने विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. हा प्रकार तिच्या नातेवाईकांना समजताच त्यांनी विहिरीतून पूजाला बाहेर काढले. तिला घाटी रूग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. या प्रकारामुळे तिच्या कुटुंबीयांना प्रचंड धक्का बसला. त्यांनी आरोपीच्या अटकेसाठी घाटीत संताप व्यक्त करीत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. पोलिस निरीक्षक अतुल येरमे, उपनिरीक्षक गणेश केदार यांनी कारवाईचे आश्वासन देत नातेवाइकांची समजूत काढली. त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.

तरूणाला चार वेळा दिली होती समज

संशयित आरोपी कासीम त्रास देत असल्याचे पूजाने तिच्या कुटुंबीयांना सांगितले होते. त्यांनी कासीमला समजावून सांगत पूजाला त्रास न देण्याची समज दिली होती. त्याला जवळपास तीन ते चार वेळा समजावले होते. मात्र कासीमने त्रास देणे काही थांबविले नाही. त्यातूनच अखेर पूजाने टोकाचा निर्णय घेतला.

हर्सूल पोलिसांकडून तरूणाला अटक

याप्रकरणी मृत पूजाचे वडील शिवराज पवार यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुण कासीम यासीन पठाण (२४), त्याचा बाप यासीन सुभान पठाण, चुलते गफ्फार सुभान पठाण, हारुण सुभान पठाण, भाऊ राजू यासीन पठाण, चुलत भाऊ जब्बार गफ्फार पठाण आणि इरफान हारुण पठाण या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील मुख्य आरोपी कासीमला हर्सूल ठाण्याचे उपनिरीक्षक गणेश केदार यांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांनी दिली.

विविध संघटनांची पोलिसांत धाव

तरुणाच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीने जीवन संपविल्याची माहिती समजताच शहरातील काही संघटना आक्रमक झाल्या. संघटनांच्या काही पदाधिकाऱ्यांनी घाटी व काहींनी हर्सूल ठाण्यात धाव घेत कारवाईची मागणी केली.

हे पण वाचा

टीम झुंजार