
पालकमंत्र्यांनी दिले वेळेत काम करण्याचे अल्टीमेटम
जळगाव दि. 3 ( जिमाका ) मागच्या काही दिवसात शहरातून जाणाऱ्या महामार्गात दोन महिलांसह वृद्धाच्या अपघातात मृत्यू झाला. या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम घेणाऱ्या ठेकेदारांविरुद्ध (झांडू व ॲग्रो इन्फ्रा) गुन्हा दाखल करण्याचा निर्णय रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. शहराबाहेरुन जाणाऱ्या प्रलंबित रस्त्याचे चौपदरीकरण मार्च २०२५ पूर्ण करण्याच्या बाबतीत संबधित ठेकेदाराकडून तसे लेखी प्रतिज्ञापत्र घेण्याचा निर्णयही यावेळी झाला.
पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार, अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सा.बां.विभागाचे नवनाथ सोनवणे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ठेकेदाराला ‘बायपास’ च्या कामा बाबत सविस्तर विचारणा केली, त्यावेळी मार्च २०२५ पर्यंत बायपासचे काम पूर्ण होईल, असे या ठेकेदाराने सांगितले. ‘यावेळी त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करून कामाविषयी असंतोष व्यक्त केला. काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
यावेळी आमदार सुरेश भोळे यांनी वृद्धाच्या मृत्यूनंतर आंदोलन करण्याबाबतच्या निर्णय बाबत नापासंती व्यक्त केली. प्रकल्प संचालक पवार यांनी भूमिका चुकीची भूमिका घेतल्याचे सांगून ठेकेदारांविरोधात सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल करावे असे सांगितले
‘बायपास’चे काम तातडीने पूर्ण व्हावे, यासाठी उपस्थित असलेल्या ठेकेदाराला जाब विचारण्यात आला. शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे काम दोन ठेकेदारांकडे विभागून दिल्याचे सांगण्यात आले यावर समितीने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
बायपास : मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्यासाठी अल्टीमेटम
गतिरोधक : विद्यापीठ, जैन इरिगेशन, बांभोरी, खोटेनगर, शिवकॉलनी, आकाशवाणी, इच्छादेवी, अजिंठा चौफुली, कालिका माता मंदिर चौक या ९ ठिकाणी अत्याधुनिक व प्रभावी गतिरोधक उभारण्याची जबाबदारी ‘न्हाई’ची असेल.
जनजागृतीपत फलक : वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी फलक लावण्याची जबाबदारी आरटीओ विभागाच्या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पार पाडली जाईल.
ठेकेदारांविरोधात कारवाई : दोन्ही महिलांसह वृद्धाच्या मृत्यूप्रकरणी भा.दं.वि.३०४ (अ) कलमान्वये गुन्हा दाखल केला जाईल. त्यासाठी ‘न्हाई’कडून फिर्याद दिली जाईल.
आयटीआयसमोर मोरी : आयटीआयसमोरच्या रस्त्यावर सातत्याने खड्डे पडत आहेत. त्याठिकाणी मोरी बांधण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
खड्डे भरणार : रस्त्यावर रिफ्लेक्टर लावण्यासह खड्डे भरण्याची जबाबदारी ‘न्हाई’ची असेल.
दरम्यान, या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत सोनवणे यांनी बांभोरी पुलाची स्थिती नाजूक झाली असल्याचा निष्कर्ष नोंदविला. वाहनांचा अवाजवी भार, अवैध रेतीचे उत्खनन मोठ्या प्रमाणावर झाल्याने या पुलाविषय परिक्षण करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला. वाहतूक पोलिसांसोबत ‘आरटीओ’ दरम्यान, शहरातील महामार्गावर असणाऱ्या धोकेदायक स्थळांवर वाहतूक पोलिसांच्या मदतीला आरटीओ विभागाने मानधन तत्वावर कर्मचारी नियुक्त करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
आकाशवाणी चौकात ‘सिग्नल’
दरम्यान, मनपाचे शहर अभियंता चंद्रकांत सोनगीरे यांनी दोन दिवसात आकाशवाणी चौकातील सिग्नल यंत्रणेसाठी निविदा काढली जाणार असल्याची माहिती यावेळी दिली. त्यानंतर अन्य चौकांसाठीही ही प्रक्रिया राबविली जाणार आहे.
तरसोद, पाळधी सेवारस्त्याची दुरुस्ती
जळगावकडून भुसावळकडे जाणारी वाहतूक तरसोदनजीक खोळंबते. याठिकाणी खोलवर असलेल्या रस्त्यामुळे अडचण होत असल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली. तिच स्थिती पाळधीनजीक असल्याचे सांगण्यात आले. या दोन्हीठिकाणी सिमेंटीकरणातून दुरुस्ती करण्याचे निर्देश ‘न्हाई’ला देण्यात आले आहेत.
हे पण वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






