धार्मिक : आज हरितालिकेचा व्रत असून देशातील बहुतांश भागात हरितालिकेच्या व्रताला अनन्य साधारण महत्व आहे. हरितालिकेतचं व्रत भगवान शंकर-माता पार्वतीला समर्पित असून या दिवशी भगवान शंकर आणि देवी पार्वतीची पूजा-अर्चना केली जाते.हरितालिका तृतीयेच्या निमित्ताने महिला निर्जल उपवास करत असतात. हे व्रत करताना असताना महिला शंकर आणि पार्वतीच्या मूर्तीची विधिवत पूजा करतात आणि उपवास धरत असतात. यावर्षी हरितालिकेचा शुभ मुहूर्त नेमका कधी आहे ते माहिती करून घेऊ..
हरितालिका पूजा-विधी…
हरितालिकेच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे. या दिवशी गणपती आणि शंकर-पार्वतीची पूजा करावी. जर शक्य असेल तर सत्यनारायण पूजेच्या वेळी बांधतो तसे केळीचे खांब बांधून चौरंग फुलांनी सजवा. व्रतकर्त्या स्त्रीने रेशमी वस्त्र आणि विविध अलंकार घालून मग पूजेला सुरुवात करावी.
पूजा….
चौरंगावर रंगीत वस्त्र घाला, त्यावर कलश ठेवून बाजूला तांदूळ पसरवा. त्यावर पार्वतीची छोटी मातीची मूर्ती आणि शिवलिंग ठेवा. गणपती बाप्पांचा फोटो ठेवून बाप्पाची पूजा देखील करावी. उपलब्ध फळं, फुलं अर्पण करून यावेळी शिव पार्वती मानून एका दांपत्याची देखील पूजा करावी. आपल्या जमेल तस त्यांना अन्न, वस्त्र, दक्षिणा द्यावी. स्त्रियांना हळदकुंकू आणि वान दान करावे.
पूजेसाठी लागणारे साहित्य…..
हरितालिकेच्या पूजेसाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे..: शमी पत्र, वाळू, बेलपत्र, आंब्याची पानं, वस्त्र, पांढरी फुलं, सौभाग्याचं साहित्य, काजळ, कुंकू, चौरंग, दूध, मध, तूप, तेल, चंदन, शंख, पाण्याचा कलश, घंटा, रांगोळी, निरांजन, विड्याची पाने, तेलाच्या वाती, खडीसाखर,फळं, गूळ, खोबरं, समई, पंचामृत, उदबत्ती, कापूर, पळी, अक्षता, पंचपात्र,कोरे वस्त्र, हळद, कुंकू, ताम्हण तसेच फणी आणि आरसा यांसारखं साहित्य लागणार आहे.
हरितालिकेच्या पूजेचा शुभ मुहूर्त कोणता?
पंचांगानुसार, 5 सप्टेंबर रोजी दुपारी 12:22 वाजता तृतीया तिथी सुरू होईल आणि 6 सप्टेंबर रोजी म्हणजेच (आज) पहाटे 03:01 वाजता समाप्त होईल. 6 सप्टेंबर रोजी उदया तिथी असल्याने या दिवशी उपवास केला जाईल. तर पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 06.01 ते 08.32 पर्यंत असणारा आहे.
या गोष्टी लक्षात ठेवा…..
महिलांनी फराळ करू नये केवळ फलाहार करावा.
पूजा केल्यानंतर संध्याकाळी पूजेस धूपदीप ओवाळून दूधसाखरेचा नैवेद्य दाखवावा.
दुसऱ्या दिवशी पूजेवरील निर्माल्य काढून पिंडींना गंध, भस्म, अक्षता, हळदी-कुंकू, फुले आणि बेलपत्र अर्पण करा. धूप, दीप ओवाळून दही भाताचा नैवेद्य दाखवावा.
गणपती, हरितालिका आणि भगवान महादेवाची क्रमाने आरती करावी.
आरतीनंतर स्वतःभोवती 3 प्रदक्षिणा करून नमस्कार करावा आणि मंत्रपुष्पांजली म्हणून फुले-बेलपत्र अर्पण करा.
विसर्जन मंत्राने पूजेवर अक्षता वाहून दही-भाताच्या नैवेद्यासह सर्व पूजा प्रवाहात विसर्जित करावी.
हरितालिका व्रताचे महत्त्व
हरितालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारीकांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे. पतीविषयी असणारी आपली सद्भावना व प्रेम व्यक्त करण्यासाठी तसेच इच्छित पती मिळावा यासाठी हरितालिकेच्या व्रताचे पालन करण्यात येते. इच्छित किंवा शिवशंकरासारखा वर मिळावा म्हणून विवाह इच्छुक मुलीही हरितालिकेचे व्रत करतात. या दिवशी उपवास करून पार्वती आणि तिची सखी यांच्या मातीच्या मूर्तींसोबतच शिवलिंगाचीही पूजा केली जाते. व्रतात आठ प्रहर उपवास केल्यानंतर अन्नसेवन करण्यात येते. या व्रतामुळे जीवनात येणारी सुखसमृद्धी लाभण्यासाठी व्रताचे विधिपूर्वक पालन करण्यास सांगण्यात येते.
हरितालिका हे व्रत भारतभर केले जाते. उत्तर भारताच्या बहुतांश भागात जसे की बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तराखंड, सिक्कीम आणि राजस्थानमध्ये हे व्रत केले जाते. दक्षिण भारतात अनेक ब्राह्मण कुमारीका हे व्रत करतात. तमिळनाडूमध्ये माघ शुद्ध द्वितीयेपासून तीन दिवस गौरी उत्सव चालतो. तेथे कुमारीका आणि सौभाग्यवती स्त्रियांही हे व्रत करतात. तसेच ही हरितालिका तृतीया नेपाळच्या टेकडी प्रदेशातदेखील उत्साहात साजरी केली जाते.
हे पण वाचा
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
- पतीच्या उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूनंतर तीन तासांत पत्नीने संपवली जीवन यात्रा; दोघांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार
- सोशल मिडीयावर माळी समाजावरील आक्षेपार्ह मजकुराच्या निषेधार्थ एरंडोल बंद; माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या पुतळ्याचे दहन.
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि.२१ नोहेंबर २०२४