मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर टाटा आपीएल २०२२ चा शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला सोळावा सामना गुजरात टायटन्सने ६ गडी राखून राजेशाही थाटात जिंकला. गुजरात टायटन्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. पंजाब किंग्सकडून खेळाची सुरूवात करायला कर्णधार मयंक अगरवाल आणि शिखर धवन उतरले. महम्मद सामीच्या पहिल्याच षटकात ५ धावा मयंकने काढल्या. हार्दिक पांड्याने त्याच्या पहिल्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मयंक अगरवालला तंबूचा रस्ता दाखवला. जॉनी बेस्ट्रो फलंदाजीसाठी उतरला.
जॉनी बेस्ट्रो आल्या आल्या जोषात फलंदाजी करू लागला आणि त्याचा आवेश बघून शिखर धवनही आपले हात आजमावू लागला. पण अशाप्रकारे धावा काढताना संयम दाखवणंही महत्त्वाचं असतं. तेच जॉनी बेस्ट्रोला जमलं नाही. लॉकी फर्ग्युसनने त्याला केवळ ८ धावांवर बाद केले. पंजाबचा धावफलक ५ षटकांत ३८/२ अशी स्थिती दर्शवत होता. लिअम लिव्हिंगस्टोन आणि शिखर धवनने धावसंख्या फुगवायला सुरूवात केली. चौकार षटकारांच्या आतिषबाजीचा प्रेक्षकांना मनमुराद आनंद मिळत होता. पंजाबचा धावफलक १० षटकांत ८६/२ अशी स्थिती दर्शवत होता. आणि ११व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रशीद खानने शिखर धवनला ३५ धावांवर बाद केले. याच काळात प्रत्येकी ४ चौकार आणि षटकारांच्या सहाय्याने लिव्हिंगस्टोनने २१ चेंडूंत ५० धावा पूर्ण केल्या. जितेश शर्माने झटपट २३ धावा काढल्या. त्याला दर्शन नळकांडेने बाद केलं. दर्शनने टाकलेला चेंडू ओडियन स्मिथला कळण्याआधीच तो शून्यावर बाद झाला. इतका वेळ संघाची चांगली धावसंख्या उभारावी म्हणून ज्याने किल्ला लढवला तो लिअम लिव्हिंगस्टोन रशीद खानच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने ७ चौकार आणि ४ षटकारांच्या सहाय्याने केवळ २७ चेंडूंमध्ये ६४ धावा काढल्या. धावसंख्या चांगली असल्यामुळे नवीन फलंदाज शाहरूख खानने झटपट १५ धावा काढल्या. रशीद खानने एकाच षटकात दुसरा बळी टिपला. पुढच्या षटकात कगिसो रबाडा देखील धावबाद झाला. राहुल चहरने १४ चेंडूंत बिनबाद २२ धावा काढल्या. दुसर्या बाजूला महम्मद सामीने वैभव अरोराचा त्रिफाळा उध्वस्त केला. अर्शदीप सिंगनेही झटपट बिनबाद १० धावा काढल्या. पंजाबचा धावफलक २० षटकांत १८९/९ अशी जबरदस्त धावसंख्या दर्शवत होता.
गुजरात टायटन्सकडून खेळाची सुरूवात करायला मॅथ्यू वेड आणि शुबमन गील उतरले. कगिसो रबाडाने मॅथ्यू वेडला झटपट बाद केले. शुबमन गीलने चौकाराच्या सहाय्याने २९ चेंडूंमध्ये ५० धावा काढल्या. गुजरातचा धावफलक १० षटकांत ९४/१ अशी सुस्थिती दर्शवत होता. पण पल्ला अजून मोठा होता. शुबमन गील आणि साई सुदर्शनने छान ताळमेळ साधत १०० धावांची भागीदारी केली. आणि १५व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर साई सुदर्शनला राहुल चहरने तंबूचा रस्ता दाखवला. गुजरातला विजयासाठी पुढच्या ३० चेंडूमध्ये ५६ धावांची गरज होती. शुबमन गील आणि कर्णधार हार्दिक पांड्या खेळपट्टीवर असताना विजय नक्कीच आवाक्यात होता. २४ चेंडू आणि ५० धावा असं लक्ष्य समोर दिसत होतं. राहुल चहरच्या गोलंदाजीवर पाठोपाठ २ चौकार मारत हार्दिकने संघाच्या १५० धावा पूर्ण केल्या. राहुल चहरच्या ह्या षटकात १३ धावा निघाल्या. १८ चेंडूंत ३७ धावांची गुजरातला गरज होती. १८व्या षटकात अर्शदीप सिंगने संतुलित गोलंदाजी करत केवळ ५ धावा दिल्या. आणि गुजरात समोर १२ चेंडूंमध्ये ३२ धावा असं समीकरण ठेवलं. १९व्या षटकात शतकाच्या उंबरठयावर पोहचलेल्या शुबमन गीलला कगिसो रबाडाने तंबूचा रस्ता दाखवला आणि गुजरातच्या विजयाच्या वाटा बंद केल्या. शेवटच्या ६ चेंडूंत १९ धावा काढायच्या होत्या आणि हार्दिक पांड्या आणि डेव्हिड मिलरवर प्रचंड दडपण होते. त्याचाच परिणाम हार्दिक पांड्या धावबाद होण्यात झाला. पंजाबचा संघ विजयाच्या अजून जवळ पोहचला होता. पण क्रिकेट हा शेवटच्या चेंडूपर्यंत खेळला जाणारा आणि जिंकता येणारा खेळ आहे, हे आज पुन्हा नव्याने सिद्ध झाले. डेव्हिड मिलरने चौकार मारून पुढच्या चेंडूवर एक धाव घेऊन राहुल तेवटियाला फलंदाजीसाठी समोर आणले. ओडियन स्मिथच्या शेवटच्या दोन्ही चेंडूंना राहुलने हवाईयात्रा घडवून आणली. आणि २०व्या षटकाच्या अखेरीस १९०/४ असा राजेशाही विजय साजरा केला. पंजाबच्या तोंडातला घास राहुलने हिसकावून नेला. आज कोणत्या संघाच्या विजयापेक्षा महत्वाचं म्हणजे क्रिकेटचा विजय झाला. ओडियन स्मिथ त्याच्या शेवटच्या षटकामुळे कदाचित आज रात्री झोपू शकणार नाही. गुजरातचा संघ तीनही सामने जिंकून गुणतक्त्यात दुसर्या क्रमांकावर आहे.
शुबमन गीलला सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार देण्यात आला. त्याने विजयाचा शिल्पकार ठरताना ११चौकार आणि १ षटकार मारत ५९ चेंडूंत ९६ धावा काढल्या.
उद्या ४ महत्वाच्या संघांमध्ये दोन सामने होणार आहेत. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगणार आहे. तर दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि मुंबई इंडिअन्स यांच्यात पुण्याच्या एम. सी. ए. स्टेडियमवर रंगणार आहे. हैदराबाद, चेन्नई आणि मुंबई आपला पहिला विजय मिळवतील का? ह्याचं उत्तर सामन्यांच्या निकालानंतर नक्कीच मिळेल.