एरंडोल तालुक्यातील ३५ वर्षीय तरुणाचा अडावद येथे दगडाने ठेचून निर्घृण खून,महिनाभरात तिसरी घटना, पोलिसांनी घेतले चार संशयित ताब्यात.
अडावद:- येथील लोखंडेनगरमधील ३५ वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना मंगळवारी (ता. १) उघडकीस आली. येथील पोलिस ठाण्याच्या हद्दीत महिनाभरात झालेल्या खुनाच्या तिसऱ्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
चोपडा तालुक्यातील अडावद येथे मध्यरात्रीच्या सुमारास के. टी. नगरच्या मागील बाजूला असलेल्या परिसरात बापू उर्फ गरीब हरी महाजन (वय २८, रा. खर्ची, ता. एरंडोल, ह. मु. लोखंडेनगर अडावद, ता. चोपडा) या तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण करीत डोक्यात दगड टाकून त्याचा खून केला. ही घटना मंगळवार दि. १ ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अद्याप खूनाचे कारण अस्पष्ट आहे.याप्रकरणी अडावद पोलिसात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील खर्ची येथील बापू उर्फ गरीब महाजन हा तरुण गेल्या काही वर्षांपासून अडावद येथे आपल्या मामांच्या गावाला राहण्यासाठी आला होता. मध्यरात्रीच्या सुमारास त्याला लाकडी दांडक्याने मारहाण करुन त्याच्या डोक्यात दगड टाकून के टी. नगरच्या मागील बाजूस निघृण खून करण्यात आला. ही घटना मंगळवार दि. १ ऑक्टोंबर रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच अडावद पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात यांच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मृतदेहाची अवस्था बघून त्याला लाकडी दांडक्याने मारहाण केलयानंतर त्याची दगडाने ठेचून हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुलाची दगडाने ठेचून हत्या केल्याचे समजताच बापू महाजन या तरुणाच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. मुलाचा मृतदेह बघताच त्यांनी एकच आक्रोश केला. त्यानंतर पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करुन मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. याप्रकरणी मयताचे मामा शांताराम पुना महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर चाळीसगाव विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार, चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी घटनास्थळी भेट देत माहिती जाणून घेतली. तसेच खूनासंबंधित अधिक तपासकामी अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात.
श्वानपथक पाचारण
खुनाचा तपास करण्यासाठी प्रमोद वाघ यांनी जळगाव येथील श्वानपथकाला पाचारण केले. पोलिस कर्मचारी विनोद चव्हाण व प्रशांत कंखरे ‘चॅम्प’ नामक श्वानासह घटनास्थळी दाखल झाले असता, श्वानाने मारेकऱ्यांचा माग दाखविला. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. स्थानिक पोलिस कर्मचारी भरत नाईक, संजय धनगर, सतीश भोई, विनोद धनगर, भूषण चव्हाण, किरण शिरसाठ, जयदीप राजपूत उपस्थित होते.