खळबळजनक! दररोज होणाऱ्या घरगुती भांडणामुळे घराच्या अंगणातच पतीने चाकूने भोकसून केली पत्नीची हत्या.शेजाऱ्यांनाही चाकू दाखवून धमकावले.

Spread the love

चंद्रपूर :- घरगुती भांडणातून पतीने पत्नीची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना चंद्रपूरमध्ये घडली. चाकूने भोसकल्यानंतर पत्नी विव्हळत घराच्या अंगणात पडली होती. यावेळी धावत येणाऱ्या शेजाऱ्यांनाही हातात चाकून घेऊन मदतीसाठी न येण्यासाठी धमकावले.या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी कोठारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. वंदना धनपाल रामटेके असे मृत महिलेचे नाव आहे. तर धनपाल माधव रामटेके असे आरोपी पतीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

वंदना आणि धनपाल यांच्यात नेहमी भांडणे होत असत. धनपाल हा दारुविक्रीचा अवैध धंदा करत होता. त्याचे पत्नी आणि मुलांसोबत पटत नव्हते. धनपालला दोन मुलगे असून मोठा मुलगा बाहेरगावी राहतो तर लहान मुलगा त्याच्याजवळ राहतो. गुरुवारी सकाळी धनपालचे पत्नी वंदनासोबत पुन्हा कडाक्याचे भांडण झाले. यानंतर धनपालने घरातील चाकू आणला आणि घराच्या अंगणातच वंदना यांच्यावर सपासप वार केले. वंदना या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. ते पाहून शेजारी मदतीसाठी धावले. मात्र धनपालने मदतीसाठी धावणाऱ्या शेजाऱ्यांनाही चाकू दाखवून धमकावले.गावकऱ्यांनी कोठारी पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली.

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत धनपाल यास ताब्यात घेतले. यानंतर वंदना यांना उपचारासाठी कोठारी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. परंतु तेथे डॉक्टर हजर नसल्याने तिला बल्लारपूरकडे घेऊन जात असताना रस्त्यातच वंदनाने प्राण सोडले. याप्रकरणी धनपालच्या मुलाने कोठारी पोलिसात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत धनपालला अटक केली आहे. कोठारी पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश खरसान पुढील तपास करीत आहेत.

मुख्य संपादक संजय चौधरी