माहेरी गेलेल्या पत्नीला आणायला गेला, सासरकडील मंडळींनी केली मारहाण दिले हाकलून, नैराश्येत गळफास घेत संपविले जीवन, पत्नीसह चौघांवर गुन्हा दाखल.

Spread the love

अंबड :- पत्नीला आणण्यासाठी गेलेल्या पतीला सासरकडील मंडळींनी मारहाण केल्याने पतीने आत्महत्या केली. ही घटना घुंगर्डे हदगाव (ता. अंबड) येथे शुक्रवारी सकाळी घडली. याप्रकरणी सासरकडील चौघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोंदी परिसरातील घुंगर्डे हदगाव येथील शिंदेवाडी येथील रहिवासी पप्पू बबन शिंदे (वय ३०) याचा काही दिवसांपूर्वी पत्नीबरोबर घरगुती वाद झाला होता. या वादामुळे त्याची पत्नी माहेरी निघून गेली होती. त्यानंतर पप्पू हा पत्नीला आणण्यासाठी सासरवाडीला गेला होता, परंतु सासरवाडीच्या लोकांनी त्याला बेदम मारहाण करून तेथून हाकलले होते.

तेव्हापासून तो निराश होता.शुक्रवारी सकाळी त्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचे वयोवृद्ध आजोबा त्याला झोपेतून उठवण्यासाठी गेले असता, ही घटना उघडकीस आली. घटनास्थळी गोंदी पोलिसांनी धाव घेऊन मृतदेह गोंदी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला. तेथे पप्पूच्या नातेवाइकांनी सासरवाडीच्या लोकांवर गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला. पोलिसांनी पत्नी मोनिका पप्पू शिंदे, सासरा भालचंद्र शेटीबा झाकणे, सासू पुतळीबाई भालचंद्र झाकणे, मेहुणा सुनील भालचंद्र झाकणे (सर्व रा. नागझरी, ता. गेवराई, जि. बीड) यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. अल्पभूधारक शेतकरी असलेल्या पप्पूला एक मुलगी व दोन मुले आहेत.

आत्महत्येपूर्वी लिहून ठेवली चिठ्ठी

सासरवाडीच्या लोकांनी पत्नीच्या नावे जमीन कर नाही तर तुझ्यासह परिवाराला व मधल्या माणसांना मारून टाकू, अशी धमकी दिल्याचे तसेच सासुरवाडीत मारहाण झाल्यामुळे अपमान सहन होत नाही. त्यामुळे आपण फाशी घेऊन मरणार असल्याचे तसेच आत्महत्येस कारणीभूत असलेल्यांची नावे त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत लिहून ठेवली आहेत.

मुख्य संपादक संजय चौधरी