परिवार लोक सार्वजनिक दुर्गा देवीची आरती करण्यासाठी बाहेर असल्याने जीवितहानी टळली…
एरंडोल :- तालुक्यातील कासोदा येथे घरगुती गॅस सिलेंडरचा गळतीमुळे सिलिंडरचा भीषण स्फोट झाल्याने ६ जण होरपळले असून दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. घराला आग लागून अंदाजे लाखो रुपयांपर्यंत नुकसान झाल्याचे समजते. घरातील परिवार अंगणात सार्वजनिक दुर्गा देवीची आरती करण्यासाठी बाहेर असल्याने जीवितहानी टळली. सदर घटना दि. ६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ ते ७:३० दरम्यान येथील खैरनार गल्लीतील अनिल पुना मराठे यांच्या घरी घडली.
कासोदा येथील रुग्णालयात जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती जाणून घेतली.मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे खैरनार गल्लीतील अनिल पुना मराठे हे पेंटर काम करून आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाह भागवतात दि. ६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ ते ७:३० दरम्यान रात्रीच्या सुमारास सुमारास त्यांनी गॅस सिलेंडरची हंडी संपल्याने नवीन हंडी आणली होती. ती त्यांनी बसवल्यानंतर त्यातून गॅस लिकेज होऊन आग लागली. रस्त्याच्या पलीकडील २५ ते ३० फुट अंतरावर असलेल्या किराणा दुकानावर उभे असलेले सागर किसन मराठे, आबा सुकलाल चव्हाण, भाऊसाहेब गायकवाड, ज्ञानेश्वर देवराम पाटील, दिपक रमेश खैरनार, नगराज देवराम पाटील व आजूबाजूच्या ग्रामस्थांना आगीची माहिती कळताच त्यांनी मराठे यांच्या घराच्या दिशेने धाव घेतली.
त्यावेळी अचानक सिलिंडरचा भीषण स्फोट झाला.हा स्फोट इतका भीषण होता की आसपासचा परिसर हादरून ग्रामस्थ जोरात फेकले गेले. या स्फोटात आठ जण भाजले गेले. यापैकी दोघांना किरकोळ दुखापत झाली. तर ६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
घटनेची माहिती कळताच गावातील इतर ग्रामस्थांनी जखमींना जळगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. या स्फोटानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.आग विझवण्यासाठी एरंडोल येथील अग्नीशमन दलाचे बंब मागवण्यात आले होते. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.