एरंडोल :- शेतातून गेलेल्या वीज खांबांवरून वीजतारांची चोरी करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेने छडा लावला असून, या प्रकरणी तीन संशयितांना अटक करून त्यांच्याकडून ३ हजार ८०० मीटर वीजतारा जप्त करण्यात आल्या आहेत. अटकेतील संशयितांनी तब्बल पाच मोठ्या गुन्ह्यांची कबुली दिली असून, एरंडोलसह इतरही तालुक्यात चोऱ्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. एरंडोलसह धरणगाव तालुक्यातील शेतशिवारांमध्ये उभ्या वीज खांबांवरील तारा चोरीला जाण्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.
एकट्या एरंडोल पोलिस ठाण्यात या प्रकरणी पाच वेगवेगळे गुन्हे दाखल झाले असताना तारा चोरणारे पोलिसांना सापडतच नव्हते. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या तक्रारींची दखल घेत गुन्हे शाखेला चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना केल्या होत्या. निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील उपनिरीक्षक राहुल तायडे, संदीप मांडोळे, नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहुल कोळी यांच्या पथकाने एरंडोल शिवारात खबऱ्यांना सतर्क करून या प्रकरणी मिळालेल्या गुप्त माहितीचा पाठपुरावा करत असताना रवींद्र अनिल मिस्तरी (वय ३८, रा. एरंडोल साईनगर), धनराज प्रकाश ठाकूर (वय ४६, रा. अमळनेर दरवाजा), समाधान नारायण पाटील (वय ४५, एरंडोल, नारायणनगर) या तिघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले.पोलिसी ‘खाक्या’ दाखवताच तिघांची कसून चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली दिली
त्यावेळी त्यांनी शेतातील तार चोरी केल्या बाबत कबुली दिली असून त्यांचे कडून १। एरंडोल पोलीस स्टेशन सीसीटीएनएस गु.र.नं. १३/२०२४ भा.द.वि. कलम ३७९, २) एरंडोल पोलीस स्टेशन सीसीटीएनएस गु.र.नं. ७९/२०२४ भा.द.वि. कलम ३७९, ३) एरंडोल पोलीस स्टेशन सीसीटीएनएस गु.र.नं. १२७/२०२४ BNS कलम ३०३ (२), ४) एरंडोल पोलीस स्टेशन सीसीटीएनएस गु.र.नं. १३५/२०२४ BNS कलम ३०३ (२), ५) कासोदा पोलीस स्टेशन सीसीटीएनएस गु.र.नं. १५१/२०२४ BNS कलम ३०३ (२) असे एकुण ५ गुन्हे उघडकीस आणले असून त्यांचे कडून १,५०,०००/- रु कि.ची ३८०० मीटर विजेची तार हस्तगत करण्यात आली असून, ३ हजार ८०० मीटर वीजतारांचे बंडल काढून दिले आहेत. तिघांना अटक करून एरंडोल पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
अशी करीत होते विजेच्या तारांची चोरी
मध्यरात्रीच्या सुमारास शेतशिवारातील वीज डीपीवरून एक व्यक्ती वीजपुरवठा खंडित करीत होता. इतर दोघे वीज खांबांवर चढून तारा कापून त्यांचा गुंढाळणी करून पसार होत असे. अटकेतील तिघांनी पाच गुन्ह्यांची कबुली दिली असून, त्यांच्याकडून इतरही गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.