इंदापूर :- तालुक्यात दोनच दिवसांपूर्वी आजारामुळे पत्नीचा मृत्यू झाला, तर रविवारी पतीने आत्महत्या केली. नियतीच्या या क्रूर खेळात मात्र सात महिन्यांची चिमुकली पोरकी झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पत्नीच्या मृत्यूने नैराश्य आल्याने तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे.या तरुणाचे नाव गोपाळ ऊर्फ स्वप्निल प्रदीप सुतार (वय 24, रा. मदनवाडी, ता. इंदापूर) असे आहे.
याबाबत माहिती अशी की, स्वप्निल याची पत्नी श्रावणी सुतार हिचा डेंग्यू आजाराने शुक्रवारी (दि. 27) मृत्यू झाला. या घटनेने अवघे सुतार कुटुंब व नातेवाईक दुःखात होते. रविवारी स्वप्निल याने मी थकलोय, जरा आराम करतो, असे म्हणत तो घरातील खोलीत गेला. बराच वेळ झाल्याने घरातील नातेवाइकांनी त्याला हाका मारल्या. मात्र, आतून प्रतिसाद न आल्याने खिडकीतून डोकावून पाहता स्वप्निल याने छताच्या लोखंडी अँगलला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालयात आणले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
या घटनेने मदनवाडी व भिगवण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. स्वप्निल याचे मोबाईल शॉपीचे दुकान होते. मात्र, दोन दिवसांच्या अंतरात पती-पत्नीचा मृत्यू अनेकांच्या मनाला चटका लावून गेला.या घटनेने मदनवाडी व भिगवण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. स्वप्निल याचे मोबाईल शॉपीचे दुकान होते. मात्र, दोन दिवसांच्या अंतरात पती-पत्नीचा मृत्यू अनेकांच्या मनाला चटका लावून गेला.
या घटनेची फिर्याद चुलत भाऊ संतोष सुतार यांनी भिगवण पोलिसात दिली असून, सहायक पोलिस निरीक्षक विनोद महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली महेश उगले व शैलेश हंडाळ या घटनेचा तपास करीत आहेत.