आग्रा (उत्तर प्रदेश) :- येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सरकारी शाळेतील शिक्षिकेला चार तासांपर्यंत डिजिटल अरेस्ट ठेवण्यात आलं होतं. आरोपीने पोलिसांची वर्दी परिधान करत महिलेला व्हॉट्सअॅप कॉल केला.त्यानंतर त्याने असं काही सांगितले की महिलेचा जीव गमवावा लागला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. महिलेला आरोपीने व्हॉट्सअॅप कॉल केला. त्यानंतर तुमच्या मुलीला सेक्स रॅकेटमध्ये पकडण्यात आलं असून तिला सोडवायचं असेल तर 15 मिनिटांत 1 लाख रुपये पाठवा. अन्यथा तिचा व्हिडिओ व्हायरल करण्यात येईल, अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपीने मुलीचा आवाजही महिलेला ऐकवला. त्यात ती आई मला वाचव, अशी एक व्हॉइस नोटदेखील ऐकवली. आरोपीची धमकी ऐकून शिक्षकेला मोठा धक्का बसला त्यातच तिला हृदयविकाराचा झटका बसला.
कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे तपासणीनंतर तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. मालती वर्मा असं या शिक्षिकेचे नाव असून तिचे वय 58 वर्षे आहे. महिला एका सरकारी शाळेत शिक्षिका म्हणून काम करते. तसंच, या घटनेने कुटुंबीयांमध्ये तणावपूर्व वातावरण होते. पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 सप्टेंबर रोजी दुपारी जवळपास 12 वाजता त्यांना व्हॉट्सअॅप कॉल आला. डीपीवर पोलिसांच्या वर्दीतील एका व्यक्तीचा फोटो होतो. फोन उचलताच आरोपीने महिलेला म्हटलं की, तुमची मुलगी सेक्स सँडलमध्ये पकडली गेली आहे. जर तिला वाचवायचं असेल तर मी जसं सांगतो तसं करा, आरोपीची धमकी ऐकून महिलेला जबरदस्त धक्का बसला.
महिलेच्या मुलाने सांगितल्यानुसार, आईने त्याला फोनवरुन सगळी घटना सांगितली. आरोपीने महिलेकडे एक लाख रुपये मागितले होते. तसंच, फोनचा कोड +92 पासून सुरू होत होता. जो पाकिस्तानचा आहे. या प्रकरणी एसीपी मयंत तिवारी यांनी म्हटलं की, 30 सप्टेंबर रोजी महिलेचा मृत्यू झाला आणि गुरुवारी याप्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी गांभीर्याने चौकशी केली जात आहे. त्याप्रमाणे पुढील कारवाई केली जाईल.
फसवणुकीचा नवा प्रकार-
ही घटनेत ‘डिजिटल अरेस्ट’ हा नवा प्रकार समोर येत आहे. या प्रकारात फसवणूक करणारे लोक, पीडितांच्या भावना वापरून त्यांना आर्थिक फसवणुकीत अडकवतात. फेक कॉल्सद्वारे लोकांना गोंधळात टाकून पैसे उकळण्याचा हा नवा प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.
सायबर गुन्ह्यांपासून सावध राहा-
आग्रा पोलिसांनी या घटनेची दखल घेत तपास सुरू केला आहे. मालती वर्मा यांना आलेल्या कॉल्सची तपासणी सुरू असून या घटनेमुळे अनेक लोकांना जागरूकता करण्याची गरज आहे. पोलीस अधीक्षक मयंक तिवारी यांनी म्हटलं, “डिजिटल अरेस्टच्या नावाखाली फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. याविरुद्ध लढण्यासाठी जनतेने जागरूक आणि सतर्क राहणे गरजेचे आहे. डिजिटल युगात सायबर सुरक्षेला प्राधान्य दिलं पाहिजे.”