हरिद्वार :- दसरा आणि विजयादशमी या दिवशी असे म्हटले जाते की प्रभू श्रीरामाने रावणाचा वध केला होता. म्हणूनच या सणाला असत्यावर सत्याचा विजय असे म्हटले गेले आहे. याच निमित्ताने ठिकठिकाणी रामलीला नाटकाचे आयोजन केले जाते. असेच आयोजन उत्तराखंडच्या हरिद्वार कारागृहात करण्यात आले होते. मात्र यावेळी असे काही घडले ज्यामुळे पोलिस प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे. उत्तराखंडच्या हरिद्वार कारागृहात विजयादशमीनिमित्त रामलीला नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. यात कारागृहातील कैदीच राम, लक्ष्मण, रावण, वानर अशी पात्रे साकारत होते. इतर कैदी आणि कारागृहाचे सुरक्षा गार्ड्स या कार्यक्रमाचा आनंद घेत होते.
याच दरम्यान काही कैद्यांच्या कृतीमुळे पोलिसांच्या पायाखालील जमीन सरकली. ही रामलीला सुरू असतानाच दोन कैद्यांनी पोलिसांची नजर चुकवून भिंत ओलांडून कारागृहातून पळ काढला. सध्या त्यांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.शुक्रवारी रात्री ही घटना घडली आहे. यावेळी कारागृहात रामलीला कार्यक्रम सुरू होता. नाटकादरम्यान सीतेचा शोध सुरू होता. याच संधीचा फायदा घेत दोन कैद्यांनी तिथून धूम ठोकली. सगळेजण नाटक पाहण्यात इतके मग्न होते की कोणालाच या घटनेचा थांगपत्ता लागला नाही. यानंतर कैद्यांची मोजणी करण्यात आली तेव्हा त्यात दोन कैदी नसल्याचे पोलिसांच्या लक्षात आले आणि तपास सुरू झाला. ज्या ठिकाणी काम सुरू होते त्या ठिकाणी एक शिडी लावून हे कैदी फरार झाले.
तुरुंगातून पळून गेलेल्या आरोपींची नावे पंकज आणि राजकुमार असून दोन्ही कैदी जघन्य गुन्ह्यात दोषी आहेत. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. आरोपींचा शोध सुरू आहे. कारागृह कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचे कारागृह अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे.पळून गेलेल्या कैद्यांमधील आरोपी पंकज हा एका खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. तर, राजकुमार अपहरण प्रकरणात अंडरट्रायल आहे. कैदी पळून गेल्यानंतर कारागृह प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. दुसरीकडे आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.