पारोळ्यात रथोत्सवात भाविक भक्तांची मांदियाळी; ३८५ वर्षाची परंपरा; महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीचा ‘रथ’

Spread the love



पारोळा | प्रतिनिधी
महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीचा रथ म्हणुन पारोळ्यातील श्री बालाजी महाराजांचा रथ सुप्रसिद्ध आहे. तब्बल ४१ फूट उंच असलेला रथ शहरातीलचं नव्हे तर राज्यभरातील भाविकांचे लक्ष वेधून घेतो. या रथाला ३८५ वर्षाची परंपरा असून आजही परंपरा अबाधित आहे.

पारोळ्याचे आराध्य दैवत प्रतितिरुपती श्री बालाजी महाराज राज्याच्या कानाकोपऱ्यातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. परिणामी राज्यातील भाविक-भक्तगण रथोत्सवाला हजेरी लावून श्रीच्या चरणी लिन होतात. रथोत्सव मोठ्या जल्लोषात ढोल ताश्याच्या गजरात ‘लक्ष्मी रमणा गोविंदा बालाजी महाराज की जय’च्या नामघोषाने रथ मिरवणूकीला सुरुवात झाली. रथाच्या पुढे विविध लेझीम मंडळे कल्पकतेने देखाव्याच्या माध्यमातून सामाजिक संदेशसह जन प्रबोधन करतात.

पालकमंत्रीच्या हस्ते पाद्यपूजा

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रभू बालाजी महाराज यांची पाद्यपूजा करण्यात आली. तदनंतर रथ ‘लक्ष्मी रमणा गोविंदा बालाजी महाराज की जय’च्या घोषाने मार्गस्थ झाला. दरम्यान, खासदार स्मिता वाघ, माजी खा. ए. टी. पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डाँ. महेश्वर रेड्डी यांच्यासह मान्यवरांनी पूजन करून मनोभावे दर्शन घेतले.

जय जिजाऊ महिला ढोल पथक आकर्षणाचा केंद्रबिंदू
माजी नगराध्यक्ष करण पवार यांच्या सुविद्य पत्नी नगरसेविका तथा महिला व बालकल्याण सभापती अंजली पाटील यांनी स्थापन केलेल्या जय जिजाऊ महिला ढोल पथकाने शिस्तबद्ध पद्धतीने ढोल बडविणे, लेझीम खेळणे यामुळे लक्ष वेधून घेत महाराष्ट्र संस्कृतीचा जागर केला. या पथकात माजी नगराध्यक्ष करण पवार यांनी भेट देत स्वतः ढोल बडवीत आनंद द्विगुणित केला.

महाजन परिवाराची ४५ वर्षाची परंपरा कायम

शहरातीत दिलीप महाजन यांच्या परिवाराकडून गेल्या ४५ वर्षांपासून रथासाठी केळीचे खांब समर्पित केले जातात. रथाच्या चहूबाजूला केळीचे खांब लावून आकर्षक सजावट देखीत केली जाते. ही परंपरा ४५ वर्षांपासून अखंडित सुरू असून यंदाचे ४६ वे वर्ष आहे. यापुढेही ही सेवा सुरू राहील, असे दिलीप महाजन यांनी सांगितले.

मुख्य संपादक संजय चौधरी