कागल :- येथील कल्याणी पार्कमध्ये एका विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.रागिणी ऊर्फ गीतांजली कुलदीप मातीवडर (वय २७) असे तिचे नाव आहे. या घटनेची माहिती समजताच महिलेच्या टोप येथील संतप्त झालेल्या नातेवाइकांनी कागल येथे घराची तोडफोड केली. संबंधित महिलेला जाच करत मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी महिलेचा पती कुलदीप आणि सासू सुशीला या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.
दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. कुलदीप राजाराम मातीवडर (मूळ रा. कोगनोळी, ता. निपाणी) हे पत्नी रागिनी ऊर्फ गीतांजली, दोन मुले आणि आईसह येथील कल्याणी पार्कमध्ये राहतात. कुलदीप एका खासगी कंपनीत काम करतो. त्याचे दहा वर्षांपूर्वी टोप येथील रागिणी ऊर्फ गीतांजली हिच्याबरोबर लग्न झाले होते. त्यांना पाच वर्ष आणि आठ महिने वयांची दोन मुले आहेत. कुलदीप आणि त्याची आई सुशीला कामानिमित्त बँकेत गेले होते. यावेळी रागिणी आणि आठ महिन्यांचे बाळ हे दोघेच घरी होते.
दुपारी साडेबारा वाजता कुलदीप आणि त्याची आई बँकेतील काम आटोपून घरी आली असता घराचा दरवाजा बंद दिसला. तो उघडण्यासाठी रागिणीला हाका मारल्या असता तिने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यांना घरात लहान बाळ मोठमोठ्याने रडत असल्याचा आवाज आला. त्यामुळे कुलदीपने घराचा दरवाजा धक्के मारून उघडला. यावेळी रागिणीने घरातील छताच्या फॅनला गळफास लावून घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कुलदीपने या घटनेची माहिती कागल पोलिसांसह रागिणीच्या नातेवाइकांना दिली. पोलिस घटनेची माहिती घेत असतानाच रागिणीचे टोप येथील नातेवाईक घटनास्थळी आले.
रागिणीचा मृतदेह पाहून तिच्या नातेवाइकांनी मोठा आक्रोश केला. यावेळी संतप्त झालेल्या तरुणांनी कुलदीपच्या घरात तोडफोड केली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता कागल ग्रामीण रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी रागिणीचे चुलते बापूसो पवार यांनी कागल पोलिसांत फिर्याद दाखल केली. घटनास्थळी करवीरचे विभागीय पोलिस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर व पोलिस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी भेट दिली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक वैभव जमादार करत आहेत.