प्रेमाच्या त्रिकोण! एका प्रियकराचे दोन महिलांशी प्रेमसंबंध; प्रियकरासाठी एकीने दुसरीला संपविले

Spread the love

अमरावती :- शहरातल्या नवीन महामार्गावर असणार्‍या श्रीकृष्ण मंदिराजवळ मंगळवारी रात्री झालेल्या हत्याकांडात तरूणींचा नव्हे तर महिलांचा सहभाग होता. दोघींनाही प्रियकर आपल्याकडेच राहावा, असे वाटत होते.त्यातूनच ही हत्या झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.शुभांगी रा. आर्वी असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून सीमा नाव्याच्या महिलेने तीची हत्या केली आहे. पोलिसांनी आरोपी सीमा आणि सूरज देशमुख यांना अटक केली.

जिल्ह्यातील कुर्‍हा येथील रहिवासी सूरज देशमुख याचे चांदूर रेल्वे तालुक्यातील एका गावात राहणार्‍या सीमा आणि वर्धा जिल्ह्यातील आर्वीच्या शुभांगी या दोन्ही महिलेसोबत प्रेमसंबंध होते. या दोघी विवाहित असून त्या नवर्‍यापासून विभक्त राहतात. या दोघींनाही सूरज देशमुख याने अमरावतीत विविध भागात भाड्याने घर देखील करून दिली होती. दोघीही परिसरात धुणी- भांडी घासण्याचे काम करायच्या. सूरजचे दोन्ही महिलांसोबत असणारे संबंध दोघींनाही माहिती होते.मागील काही दिवसांपासून मात्र या दोघींमध्ये सूरजवरून खटके उडायला लागले.

तिघांमध्ये सुरू असणारा हा वाद संपुष्टात यावा यासाठी मंगळवारी तिघांनीही भेटून तोडगा काढण्याचा ठरवले. शुभांगी मंगळवारी सकाळीच आर्वीवरून अमरावतीला आली. तिच्यासोबत राजेश्री ही मैत्रीण होती. दुपारी या दोघीही पंचशील नगर परिसरात राहणार्‍या प्रज्ञा या मैत्रिणीकडे गेल्या होत्या. दुपारी चारच्या सुमारास सूरज याने शुभांगीला कॉल करून बियाणी चौकात बोलावले. दरम्यान सूरजने सीमाला नवीन महामार्गावरच्या कृष्ण मंदिरात भेटायला बोलावले. शुभांगी आणि राजेश्रीला तो तेथे घेऊन गेला. येथे शुभांगी आणि सीमा यांच्यात हाणामारी झाली. सीमाने घरगुती वापरातील चाकू काढून शुभांगीच्या खांद्यावर आणि गळ्याजवळ वार केले.

शुभांगी जखमी अवस्थेत खाली पडताच तीने घटनास्थळावरून पळ काढला. सूरज देखील पळायच्या तयारीत होता.मात्र, शुभांगीची मैत्रीण राजेश्री हिने त्याला जाऊ दिले नाही. सूरजने जखमी अवस्थेत असणार्‍या शुभांगीला दुचाकीवरून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केल. डॉक्टरांनी तपासणीनंतर तीला मृत घोषित केले. संधीसाधून सूरजने रुग्णालयातून पळ काढला. राजश्रीने पोलिसांना ती माहिती दिली. पोलिसांनी पाठलाग करून त्याला मालटेकडीजवळ पकडले. मैत्रिण राजेश्रीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बुधवारी सकाळी सीमाला बस स्थानकावरून ताब्यात घेण्यात आले, अशी माहिती पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली.

मुख्य संपादक संजय चौधरी