चारित्र्याच्या संशयातून पत्नीच्या डोक्यात खलबत्ता मारून केला खून;मृतदेह खांद्यावर उचलून फेकला विहिरीत,स्वतः पोलीस ठाण्यात केलं आत्मसमर्पण.

Spread the love

आई जीवानिशी गेली, वडिलांना अटक झाली,दोन निरागस भावंडे जन्मदात्यांच्या प्रेमाला पारखी झाली.

कोरेगाव :- चारित्र्याच्या संशयातून पत्नीच्या डोक्यात खलबत्ता मारून खून केला, त्यानंतर तिचा मृतदेह गावातील विहिरीत फेकून पती ठाण्यात पोहोचला. ही थरारक घटना देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव येथे १६ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता घडली.पोलिसांच्या माहितीनुसार, स्नेहा लोकेश बाळबुद्धे (२५) असे मृत विवाहितेचे नाव असून लोकेश गुणाजी बाळबुद्धे (३२) यास जेरबंद केले आहे. कोरगाव येथे गुणाजी बाळबुद्धे हे शेतकरी राहतात. दोन ते अडीच एकर शेतीत राबून तसेच मजुरी काम करून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागतो. त्यांचा मुलगा लोकेश हा पत्नी स्नेहाच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. यातून त्यांच्यात नेहमी वाद होत होते.

१६ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता गुणाजी बाळबुद्धे हे स्वतःची सायकल दुरुस्त करण्यासाठी गावात गेले होते, तर त्यांची पत्नी माहेरी गेली होती. घरी लोकेश व त्याची पत्नी स्नेहा हे दोघे होते. या दाम्पत्यास दोन मुले असून त्यातील लहान मुलगा पलंगावर झोपला होता तर मोठा शाळेत गेला होता. लोकेश व स्नेहा यांच्यात वाद सुरू झाला. या वादाचे पर्यवसान स्नेहाच्या खुनात झाले. तपास पो. नि. अजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कोमल माने तपास करत आहेत.

भावंडे आई-वडिलांना पारखी, नातेवाइकांचा आक्रोश

स्नेहा व लोकेश यांचा एक मुलगा पहिलीच्या वर्गात असून दुसरा अवघ्या तीन वर्षांचा आहे. आई जीवानिशी गेली, वडिलांना अटक झाली, यामुळे ही निरागस भावंडे जन्मदात्यांच्या प्रेमाला पारखी झाली. यावेळी नातेवाइकांनी एकच आक्रोश केला, त्यामुळे उपस्थितांच्याही अश्रूचा बांध फुटला.

प्रेत खांद्यावर उचलून नेत विहिरीत फेकले

वादात लोकेशने रागाच्या भरात घरातील खलबत्ता उचलून स्नेहाच्या डोक्यात दोनदा मारला. यात रक्तबंबाळ होऊन ती जागीच मृत्युमुखी पडली. यानंतर लोकेशने तिला खांद्यावर उचलून नेत गावातील चौकालगतच्या विहिरीत फेकले. हा थरार पाहून ग्रामस्थ अक्षरशः हादरून गेले. घरापासून विहिरीपर्यंत रक्ताचे थेंब पडलेले होते.

पोलिसांना म्हणाला, मी पत्नीचा खून करून आलो

दरम्यान, या घटनेनंतर लोकेश बाळबुद्धे देसाईगंज येथे पोहोचला. तेथे पोलिस ठाण्यात जाऊन त्याने आत्मसमर्पण केले. पोलिसांना त्याने मी पलीचा खून केला आहे, असे सांगितले. त्यावर पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला. पोलिसांनी लगेचच त्यास ताब्यात घेऊन कोरेगाव गाठले. स्नेहाचा मृतदेह विहिरीबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला.

मुख्य संपादक संजय चौधरी