मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टाटा आपीएल २०२२ चा एकोणीसावा सामना कोलकत्ता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेला सामना दिल्लीने ४४ धावांनी जिंकला. कोलकत्ता नाईट रायडर्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. दिल्ली कॅपिटल्सकडून खेळाची सुरूवात करायला पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नर उतरले. दोघांच्याही टप्प्यात चेंडू चांगला येत असल्यामुळे धावांचा जणू पाऊस पडत होता. केवळ २४ चेंडूंमध्ये त्यांनी संघाचं अर्धशतक पूर्ण केलं. त्यात पृथ्वीच्या ३० धावा होत्या. आणि बघता बघता ८व्या षटकाच्या अखेरीस पृथ्वीने केवळ २७ चेंडूंत ५० धावा झळकावल्या. सुनील गावस्कर नेहमीच सांगतात अर्धशतक किंवा शतक पूर्ण केल्यानंतर काही चेंडू शांतचित्ताने खेळा त्यामुळे तुम्हांला तुमची खेळी अधिक दीर्घकाळ खेळता येईल. पृथ्वी शॉने हा मंत्र पाळला नाह आणि दिल्लीचा पहिला गडी ९३ धावांवर बाद झाला. त्याच्या जागी कर्णधार ऋषभ पंत खेळपट्टीवर आला. धावांचं बळ दिसत असल्यामुळे ऋषभनेही त्याचे हात सैल केले. वरुण चक्रवर्थीची लयच ह्या दोन्ही फलंदाजांनी बिघडवली. त्याच्या एकाच षटकात तब्बल २४ धावा निघाल्या. पॅट कमीन्सने पहिल्या षटकात १६ धावा दिल्या म्हणून त्याला विश्रांती देण्यात आली होती. पण पॅट कमीन्सने डाव्याच्या १२व्या षटकात पुन्हा १२ धावा दिल्या. डेव्हिड वॉर्नरने जबरदस्त षटकार मारत आपलं आणि भागीदारीचंही अर्धशतक साजरं केलं. आंद्रे रसेलने ह्याच षटकात ऋषभ पंतला २७ धावांवर बाद केलं. ललित यादवला सुनिल नरेनने पायचित टिपले. सुनिल नरेनने पुढच्याच षटकात रावमन पॉवेलला तंबूचा रस्ता दाखवला. तर पुढच्या षटकात उमेश यादवने डेव्हिड वॉर्नरचा अडसर दूर केला. वॉर्नरने ६ चौकार आणि २ षटकार यांच्या सहाय्याने ४५ चेंडूंत ६१ धावा काढल्या. अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूर असे दोन्ही नवे फलंदाज खेळपट्टीवर होते. उमेश यादवच्या शेवटच्या षटकात ह्या दोघांनी १९ धावा काढल्या. आणि २०व्या षटकाच्या अखेरीस दिल्लीने कोलकत्या समोर २१५ धावांचा डोंगर उभा केला. अक्षर पटेल २२ आणि शार्दुल ठाकूर २९ धावांवर अविजीत राहिले.
कोलकत्ता नाईट रायडर्सकडून खेळाची सुरूवात करायला अजिंक्य रहाणे आणि व्यंकटेश अय्यर उतरले. शार्दुल ठाकूरच्या वैयक्तिक पहिल्या षटकात व्यंकटेश अय्यरने दोन जबरदस्त षटकार ठोकत संघाची धावसंख्या १६ वर पोहचवली. पण पुढच्याच षटकात खलील अहमदने व्यंकटेश अय्यरला १८ धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. कर्णधार श्रेयस अय्यर फलंदाजीसाठी खेळपट्टीवर आला. आल्या आल्या त्याने खणखणीत चौकार मारला. आणि त्याचे इरादे स्पष्ट केले. धावांच्या आव्हानाचा डोंगर पाहून अजिंक्य रहाणे प्रचंड तणावाखाली आला होता. मोठ्या आव्हानांचा सामना करताना अजिंक्य नेहमीच नांगी टाकतो. खलील अहमदने हीच संधी साधत त्याला परतीचा रस्ता दाखवला. ९व्या षटका अखेर कोलकाता ७४/२ पर्यंत पोचला. पण पुढच्या ११ षटकांत १४२ धावांचं दिव्य त्यांच्या समोर होतं. १०व्या षटकात श्रेयस अय्यर आणि नितीश राणाने अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. आणि ११व्या षटकात कोलकत्याच्या १०० धावा पूर्ण झाल्या. ५४ चेंडूंत ११५ धावा कोलकत्याला विजयासाठी हव्या होत्या. दिल्लीने गोलंदाजीत बदल करत चेंडू ललित यादवला दिला. नितीश राणाने त्याला सणसणीत षटकार मारला. त्याचा वचपा म्हणून ललितने त्याला ३० धावांवर बाद केले. पुढच्याच षटकात श्रेयसने आपले अर्धशतक षटकार मारून पूर्ण केले. आणि पुढच्याच चेंडूवर ऋषभ पंतने कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर ५४ धावांवर त्याला यष्टीचित केले. दोन्ही जम बसलेले खेळाडू माघारी परतले आणि आव्हान अजून कठीण झालं.
खलील अहमदने सॅम बिलिंग्सला १५ धावांवर बाद केले. बाकीचे फलंदाज कधी आणि गेले हेदेखील कळण्यास वाव उरला नाही. पॅट कमिन्सला कुलदीप यादवने पायचीत टिपले. कुलदीप यादवच्या त्याच षटकात सुनिल नरेन बाद झाला. त्यावर कहर म्हणजे त्याच षटकात उमेश यादवही शून्यावर बाद झाला. शार्दुल ठाकूरच्या शेवटच्या षटकात दोन गडी बाद झाले. कोलकत्याने मनाने गमावलेला सामना प्रत्यक्षात १७१ धावांवर सर्वबाद असा संपला होता.
कुलदीप यादवला सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार देण्यात आला. त्याने ४ षटकांत ३५ धावांमध्ये ४ गडी बाद केले होते.