एरंडोल :- गायींची निर्दयीपणे वाहतूक करणारे दोन पिकअप वाहने युवकांनी अडवून त्यातील सात गायींची सुटका करण्यात आली. पोलिसांनी दोन्ही वाहनचालकांना ताब्यात घेतले असून सातही गायींना धरणगाव येथील कामधेनु गोसेवा मंडळ येथे दाखल करण्यात आल्या आहेत.पोलिसांनी दोन पिकअप वाहन व गायी असा सुमारे ४ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत माहिती अशी की,काल (ता.२५) रात्री विजय प्रकाश देशमुख,गोपाल सुरेश महाजन,सागर भास्कर महाजन,यशवंत शंकर पाटील,दिनेश मोहन मिस्तरी,हर्शल श्रीकांत बिर्ला हे रात्री साडेअकरा वाजता राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या कासोदा नाक्यासमोरील हॉटेल बाबाजी येथे चहा पीत होते.
त्याचवेळी जळगाव कडून धरणगावकडे जाणा-या समांतर रस्त्यावर एम.एच.४७ ई २८९२ व एम.एच.१९ एस ५५९७ हि दोन पिकअप वाहने भरधाव वेगाने जातांना आढळली.वाहनांमध्ये गुरांच्या ओरडण्याचा आवाज आल्यामुळे सहाही युवकांनी वाहनांचा पाठलाग करून दोन्ही वाहने थांबवली.दोन्ही वाहनांमध्ये सात गायी निर्दयपणे बांधून कत्तलीसाठी नेत असल्याचे दिसून आले.युवकांनी वाहन चालकांकडे गुरांबाबत चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे युवकांना संशय आल्याने दोन्ही वाहने पोलीसस्थानकात आणण्यात आले.पोलिसांनी दोन्ही वाहनातील सातही गायींची सुटका करून त्यांची रवानगी धरणगाव येथील कामधेनु गोसेवा मंडळात करण्यात आली.
सर्व गायी चोरीच्या असण्याची शक्यता नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे.याबाबत विजय देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीवरून पिकअप वाहन क्रमांक एमएच ४७ ई २८९२ चा चालक वासिम रहीम तांबोळी व पिकअप क्रमांक एमएच १९ एस ५५९७ चा चालक सैय्यद नईम सैय्यद रहीम दोघेही राहणार नगरदेवळा ता.पाचोरा यांचेविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.त्यांचे दोन साथीदार अंधाराचा फायदा घेवून फरार झाले.युवकांनी दोन्ही वाहनांना पाठलाग करून थांबवले असता वाहन चालकांनी युवकांशी वाद घालण्याचा प्रयत्न केला. युवकांनी अत्यंत संयमाची भूमिका घेवून दोन्ही वाहने पोलीसस्थानकात आणल्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही.
वाहनातील सातही गायींचा रंग लाल व काळ्या रंगाच्या असून पाठीवर पांढरे ठपके आहेत.पोलीस निरीक्षक सतीश
गोराडे यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार विलास पाटील,संतोष चौधरी तपास करीत आहेत. दरम्यान एरंडोल शहरातील बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद व हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उशिरा रात्री धरणगाव येथील कामधेनु गोसेवा मंडळाच्या गोशाळेत जावून सर्व गाईंना पिकअप वाहनातून उतरून गोशाळेच्या ताब्यात देण्यात आल्या तो पर्यंत एरंडोल पोलीस स्थानकात गुन्हा नोंदण्याचे काम सुरू होते.