एरंडोल-पारोळा मतदारसंघातून जोरदार शक्तीप्रदर्शन करीत डॉ.संभाजीराजे पाटील यांनी दाखल केला अपक्ष उमेदवारी अर्ज

Spread the love

एरंडोल :- एरंडोल-पारोळा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटातून डॉ.संभाजीराजे पाटील हे इच्छूक असले तरी वाटाघाटीत ही जागा शिंदे गटाला सुटली व महायुतीतर्फे पारोळ्याचे अमोल चिमणराव पाटील यांना तिकीट जाहीर झाले. त्यानंतर डॉ.संभाजीराजे पाटील यांनी अपक्ष उभे राहत षड्डू ठोकले असून सोमवारी शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज सादर केला. महायुती व महाविकास आघाडीविरोधात आपली लढत असून मतदारसंघात विकासाची गंगा आणण्यासाठी व परिवर्तन करण्यासाठी आपली उमेदवारी असल्याचे त्यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.

शेतकर्‍यांप्रती आस्था ः बैलगाडीवरून नामांकन
डॉ.संभाजीराजे पाटील यांनी सोमवारी दुपारी भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले व दैवत बालाजी महाराजांचे आशीर्वाद घेतले व त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात शक्ती प्रदर्शन रॅली काढण्यात आली.

शेतकर्‍यांप्रती आस्था असलेल्या डॉक्टरांनी बैलगाडीवरून काढण्यात आलेली शक्ती प्रदर्शन रॅली अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली तर त्यातून डॉक्टरांची मतदारसंघातील शेतकर्‍यांप्रती असलेली आस्था दिसून आली.

स्वच्छ चारीत्र्य ः मतदारसंघ विकासाचा ध्यास
डॉ.संभाजीराजे पाटील उमेदवारी अर्ज भरल्यानंतर म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून मतदारसंघाचा विकास झाला नसल्याने आपली उमेदवारी मतदारसंघाच्या विकासासाठी आहे. अपक्ष म्हणून आपण मतदारांकडे कौल मागणार असून निश्चित आपला या निवडणुकीत विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुख्य संपादक संजय चौधरी